दिवे आगर – शांत, सुंदर आणि रम्य समुद्रकिनारा

पुण्यापासून सुमारे चार तासाच्या अंतरावर असणारं दिवे आगर हे एक छान पर्यटन स्थळ आहे. लोण्यासारखी मऊ वाळू, दूरवर पसरलेला अथांग समुद्र, किनार्यावरची वनराई, एका बाजूला दिसणारा डोंगर खूपच रमणीय दृष्य असते हे. ताम्हिणी घाटातून जाणारा रस्ता आता खूप छान झाला आहे. त्यामुळे पूर्वी ६ तासावर असणारे दिवे आगर आता ४ तासावर आले आहे.

पुण्याहून दिवे आगरला ताम्हिणी घाटमार्गे जाताना वाटेत Orchid Resort आहे. इथे खाण्याची सोय होऊ शकते. इथे त्यांच एक छोटसं पण स्वच्छ आणि सुंदर रेस्टॉरंट आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी एक झोपाळा, एक घसरगुंडी आणि एक सी-सॉ आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे (कमोड असलेलं) स्वच्छ वॉशरूम आहे.

दिवे आगर मध्ये बापट नावाच्या गृहस्थांकडे जेवणाची उत्तम सोय असते. साधं महाराष्ट्रीयन फूड असतं. पण गरम गरम आणि चविष्ट जेवण इथे मिळतं.

दिवे आगर समुद्रकिनार्याच्या बरोबर समोर अगदी १०० मीटरवर Exotica नावाचं छानसं बीच रेसॉर्ट आहे. स्वछ आणि रम्य परिसर, बरं जेवण, उत्तम आणि वैविध्यपूर्ण आणि चविष्ट नाष्टा, करमणूकीसाठी फूसबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम, झोपाळे अशी सोय, चांगलं आतिथ्य, चांगला स्टाफ ही Exotica ची काही वैशिष्ट्य. इथे सगळ्या A.C. कॉटेजेस आहेत. त्यामध्ये गरम/गार पाण्याची सोय, छोटा टीव्ही, डबल बेड, स्टोरेज अशा सोयी आहेत. फक्त कॉटेजेस थोडी लहान आहेत. (http://www.parnakutiresorts.com/ExoticaBeachResort.aspx)

रेसॉर्टमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून चहा, कॉफी, दूध, ब्रेड- बटर उपलब्ध असते. नाष्टा सकाळी ८:३० वाजता सुरू होतो. नाष्ट्यामध्ये विविध प्रकारचे पदार्थ मिळतात. एक दिवस शिरा, पोहे, उत्तपा, डोसा, इडली चटणी, सांबार, ब्रेड-बटर, ब्रेड जाम, छोले भटुरे, चहा, कॉफी, दूध तर एक दिवस उपीट, पोहे, उत्तपा, डोसा, मेदूवडा चटणी, सांबार, खिचडी, ब्रेड-बटर, ब्रेड जाम, चहा, कॉफी, दूध असे नाना प्रकार असतात. असा हा स्वादिष्ट ब्रेकफास्ट बफे तसेच लंच/डिनर, दुपारचं चहा-कॉफी हे सगळं रहाण्याच्या पॅकेजमध्ये समाविष्ट असतं. संध्याकाळी ८:३० वाजता डिनर बफे सुरू होतो. लंच आणि डिनर चवीला ठिकच वाटलं. रेसॉर्टचा स्टाफ चांगला वाटला. सौजन्यशील वाटला.

20150529_060542

20150529_083127

20150529_083222

20150529_083237

20150529_083040

20150529_084655

समुद्रकिनारा खूप छान आहे. समुद्राची वाळू अक्षरशः लोण्यासारखी मऊ आहे. समुद्रामध्ये आत गेल्यावरही एकदम सपाट भूभाग पायाला जाणवतो. कुठेही टोचणारी वाळू, बोचणारे खडे, उंचसखल जमीन नाही. समुद्रकिनार्‍यालगत दाट हिरवीगार वनराई आहे. एका बाजूला डोंगर आहे. खूप सुंदर द्दष्य असते ते. इथे सूर्यास्तही छान दिसतो. मस्त गार वारा वहात असतो आणि समोर अथांग समुद्राच्या लाटा आपल्याला भेटायला येत असतात.

IMG-20150530-WA0020

20150529_061714

20150529_061009

tivalyabavalya.wordpress.com

20150529_061341

20150529_061059

फक्त एक जाणवलं ते म्हणजे निसर्गानं भरभरून सौंदर्याची उधळण केली असली तरी मनुष्याने तो विद्रूप करायला सुरूवात केली आहे. समुद्र किनार्‍यावर खाद्यपरार्थांच्या गाड्यांची लाइन लागली आहे. समुद्रकिनार्‍यावरच्या वाळूत बराच कचरा पसरला आहे.

20150529_060948

प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, कागदी प्लेट्स, कागद, प्लास्टिक असा हर तर्‍हेचा कचरा काही प्रमाणात किनार्‍यावर पहायला मिळतो. खाद्यपदार्थ विक्रेते, त्यांचे ग्राहक, पर्यटक, स्थानिक लोक आणि प्रशासन सगळ्यांचीच ही एकत्रित जबाबदारी आहे की ज्या समुद्रामुळे विक्रेत्यांना पैसा, ग्राहकांना सोय, स्थानिकांना रोजगार, पर्यटकांना आनंद, प्रशासनाला महसूल मिळतो, तो समुद्र विद्रूप होऊ नये, निसर्गतःच जसा रम्य आहे तसाच तो रहावा यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न झाले पाहिजेत.

त्यासाठी

१) खाद्यपदार्थाच्या गाड्या समुदाच्या वाळूवर नसाव्यात. समुद्रापासून थोड्या लांब असाव्यात.

२) समुद्रकिनार्‍यावर चारचाकी/दुचाकी गाड्या आणण्यास कडक बंदी हवी.

३) बीचवर ठिकठिकाणी कचरापेट्या ठेवायला हव्यात. लोकांनी त्यामध्येच कचरा टाकायला हवा. कचरापेटीतला कचरा वेळच्या वेळी उचलला जायला हवा. सर्वांनी शक्य तितका कमी कचरा केला पाहिजे.

४) खाद्यपदार्थ विक्रेत्यांना तसेच अन्य विक्रेत्यांना, त्या त्या व्यवसायामुळे निर्माण होणार्‍या कचर्‍याची सोय करणे बंधनकारक हवे.

५) समुद्रावरच्या जेट स्की, पॅरासीलिंग, कॉड बाइकिंग, बग्गी यासारख्या अ‍ॅक्टिवीटीजवर काही प्रमाणात प्रशासनाचे लक्ष/नियंत्रण हवे. त्या अ‍ॅक्टिवीटीजच्या व्हेंडर्सना काही सेफ्टी नॉर्म्स पाळणे आवश्यक केले गेले पाहिजे.

६) पर्यटकांनीही या समुद्राचा आनंद घेताना त्याचा आदरही ठेवला पाहिजे. आपल्यामुळे या पर्यटन स्थळाचे काही नुकसान होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.

निसर्गानी आपल्याला, आपल्या भारताला भरभरून दिलं आहे. फक्त आपण त्याकडे डोळसपणे, समंजसपणे पाहून त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि या अमूल्य संपदेची काळजी घेतली पाहिजे.

Advertisements

पब्लिक लायब्ररी

राले मध्ये रहात असताना घराजवळच एक पब्लिक लायब्ररी होती. या पब्लिक लायब्ररीज खूप छान असतात. ही लायब्ररी खूप प्रशस्त, हवेशीर होती. लायब्ररीचे पार्किंगही मोठे होते. या लायब्ररी मध्ये भरपूर पुस्तके वेगवेगळ्या विभागांमध्ये विषयवार लावून ठेवलेली होती. लायब्ररीमध्ये प्रवेश घेणे खूपच सोपे असते. ५ मिनिटांमध्ये काम होते. पब्लिक लायब्ररीची सुविधा विनामूल्य असते. फक्त पुस्तके परत करण्यास उशीर झाल्यास दंड तेवढा असतो. एका कार्डवर एका वेळी हवी तेवढी पुस्तकं घेता येतात. लायब्ररीबाहेर एक ड्रॉपबॉक्स असतो. फक्त पुस्तकं रिटर्न करायचं काम असेल तेव्हा या ड्रॉपबॉक्समध्ये पुस्तकं टाकून परस्पर जाता येतं. ही पुस्तकं ठराविक वेळेला लायब्ररीचे कर्मचारी आत घेऊन जातात. लायब्ररी बंद असेल तेव्हाही रिटर्न करायची पुस्तकं या ड्रॉपबॉक्स टाकून जाता येते. पुस्तकं परत करण्यास जमणार नसेल तेव्हा ती ऑनलाइन रिन्यू करता येतात. एक पुस्तक जवळ जवळ ८-१० वेळा रिन्यू करता येते. त्यामुळे तुम्हाला दंड होऊ नये यासाठी भरपूर सोय केली असते. एवढं करून जर वेळेत पुस्तक रिन्यू किंवा रिटर्न केले गेले नाही तर मात्र प्रत्येक पुस्तकामागे प्रत्येक दिवसामागे दंड आकारला जातो.

या लायब्ररीमध्ये एक छोटेखानी कॉम्प्युटर विभाग होता. त्यामध्ये ईंटरनेट कनेक्शन असलेले १५-२० कॉम्प्युटर होते. ते कोणालाही विनामूल्य वापरता यायचे. आपल्या लॉग इन आयडी ने लॉग इन करावे लागायचे. एकदा लॉग -इन केल्यावर ३० मिनिटाचं सेशन वापरायला मिळायचं. प्रिंट आउट्सना मात्र चार्ज असायचा. लहान-मोठे कोणालाही कॉम्प्युटर्स वापरण्याची परवानगी होती. याशिवाय लायब्ररीमध्ये पुस्तकं सेल्फ चेक आउट करायची सोय होती. लायब्ररीचे कर्मचारी कोणत्याही मदतीसाठी किंवा कोणतीही माहिती देण्यास नेहमी तत्पर असायचे.

लहान मुलांच्या विभागात छोट्या छोट्या टेबल खुर्च्यांचे सेट्स होते. लहान मुलांना त्यावर सहज बसता यावे, आरामात वाचता यावे अशा तर्‍हेची व्यवस्था होती. अगदी छोट्यांसाठी वुडन खेळणी, गेम्स ठेवलेले असायचे. तिथे जवळचं लायब्ररीच्या आतच एक मोठी रूम/हॉल होता. तो छान सजवलेला असायचा. सजावट सिझननुसार वेगवेगळी केली असायची. दर आठवड्यातून एकदा वेगवेगळ्या एजग्रूपमधल्या मुलांसाठी वेगवेगळ्या वेळी या हॉलमध्ये स्टोरी टाइम असायचा. म्हणजे इथे मुलांसाठी एक छोटं पुस्तक वाचून दाखवलं जाई, कधी पपेट शो पण असे. तर कधी गाणं लावून त्यावर सोपा डान्स करून घेतला जाई. इथं मुलांना सोडून पालकांनी लायब्ररीमध्ये वेळ घालवला तरी चाले. ज्यांची मुलं लहान आहेत ते पालकं मुलांसोबत स्टोरीटाइमला बसायचे. मुलं खूप एन्जॉय करायची हा स्टोरीटाइम. विकेंडला फॅमिली स्टोरी टाइमही असायचा. त्याला जाण्याचा योग मात्र कधी आला नाही.

याशिवाय लायब्ररीच्या एका सेक्शनमध्ये टेबल- खुर्च्या होत्या, एका सेक्शनमध्ये पॉवर पॉइंट असलेले डेस्क होते जेथे बसून आपला लॅपटॉप घेऊन अभ्यास करता यायचा किंवा पुस्तकं वाचत बसता यायचे. लायब्ररीच्या एका टोकाला एक आयताकृती हॉल होता त्याला काचेची भिंत आणि काचेचं दार होतं. इथे सुद्धा अभ्यास करण्यासाठी, पुस्तकं वाचण्यासाठी व्यवस्था होती. इथेही मोबाइल/आयपॅड/लॅपटॉप चार्जिंग करण्याची सोय होती. एकूणच लायब्ररीत निरव शांतता असली तरी या विभागात तर एकदम पिन ड्रॉप सायलेन्स असायचा.

लायब्ररीचे काही ना काही कार्यक्रम सतत चालू असायचे. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असायचे. कधी ‘Craft It’ वर्कशॉप्स असायची. कधी करीअर ऑप्शन्सवर सेशन, कधी ‘Meet the artist’, कधी ‘Financial Management’ वर कार्यक्रम, कधी ‘Baby/Toddler/Family storytime’, कधी टीन एजर्ससाठी काही प्रोग्रॅम असे विविध प्रकारचे विविध वर्गांना समोर ठेवून, विविध एजग्रूपसाठी छान कार्यक्रम असायचे. आणि फेस्टिव सिझनमध्ये (जसं की इस्टर, हालोविन, ख्रिसमस) त्या त्या फेस्टिवलशी संबंधित कार्यक्रम असायचे.

या लायब्ररीमुळे, तिथल्या कार्यक्रमांमुळे वेळ छान जायचा. म्हणून आठवडा, दोन आठवड्यातून लायब्ररी ट्रीप नक्की असायची.

 

चोर :)

सकाळचे सहा वाजले होते. पहाटेचा मंद वारा वहात होता. लहानगी उर्वी गाढ झोपली होती. उर्वीची आई सकाळ सकाळीच मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेली होती. उर्वी आज झोपेतून रडतच उठली. आई घरी नव्हती. मग उर्वीच्या बाबाने पिल्लूला जवळ घेतलं, उगी उगी केलं आणि विचारलं, “काय झालं बेटा? घाबरली आहेस का तू. का रडते आहेस बाळा” मग तीन सांगितलं की तिला एक स्वप्न पडलं. त्यामुळे ती रडत रडत उठली.

थोड्या वेळाने आई आली. सुटीच्या दिवशी सात-साडेसातला उठणारी उर्वी आज इतक्या लवकर उठल्याचं पाहून आईन तिला विचारलं, “काय आज एवढ्या लवकर कसं काय बरं उठलं माझं बाळ”
उर्वी: आई, मला ना एक स्वप्न पडलं म्हणून मी रडत उठले.
आई: हो का. कसलं स्वप्न पडलं?
उर्वी: स्वप्नात ना एक चोर आला होता.
आई: बापरे. मग काय झालं पुढे?
उर्वी: थांब मी तुला सगळं पहिल्यापासून सांगते.
आई: बर सांग.
उर्वी: आपण दोघी ना बेडवर पडलो होतो आणि आपल्याकडे पाहुणे आले होते. त्यांच सामान होतं सोफ्यावरं. तेवढ्यात सोफ्याच्या मागून एक चोर आला.
आई: अरे बापरे. मग?
उर्वी: आणि तो आपला ग्लू घेऊन पळून गेला 🙂
आई: (हसू आवरत) हो का? पकडू हां आपण त्या चोराला. आणि आपला ग्लू परत मिळवू 🙂

सुट्टीतले उपक्रम (की उपद्व्याप ? ;-) )

लहान मुलांना उन्हाळी सुट्टी लागली की आया खूपच बिझी होऊन जातात. सतत मुलांना कामाला लावावे लागते. म्हणजेच सतत कशात ना कशात गुंतवावे लागते. नवनवीन अ‍ॅक्टिविटीज, क्राफ्ट्स, नवीन काही खेळ असं काही ना काही शोधून काढावं लागतं. तर असचं एकदा लेकीसोबत पेपा पिग पहाताना पॉली नावाचा पोपट बनवून पाहू असं माझ्या डोक्यात आलं आणि मग आम्ही आपापला पॉली द पॅरट बनवला 🙂

साहित्यः एक कोरा (पांढरा) कागद, हिरव्या रंगाचा पेपर (कन्स्ट्रक्शन पेपर/जाड कागद), गुगली eyes, निळ्या, काळ्या, लाल, चॉकलेटी/brown रंगाचे स्केचपेन्स(मार्कर्स),  निळ्या, लाल, केशरी रंगाचे क्रेयॉन्स, फेविकॉल/डिंक/स्कूल ग्लू, कात्री

कृती:
१) हिरव्या कागदाचा अंडाकृती(Oval) आकार कापून घ्या.
२) तो कोर्‍या कागदावर मध्यभागी चिकटवा. हे झालं पक्षाचं शरीर.
३) गुगली डोळा हिरव्या कागदावर फोटोत दाखवलेल्याप्रमाणे चिकटवा.
४) पक्षाच्या डोक्यावर निळ्या स्केचपेनने तुरा काढा. निळ्या क्रेयॉनने तो रंगवा.
५) brown मार्करने चोच काढून घ्या. ती केशरी रंगाने रंगवा.
(मी इथे केशरी कागद चोचीच्या आकाराचा कापून चोच म्हणून चिकटवला आहे. तसही करता येईल.)
६) लाल मार्करने पक्षाची शेपूट काढून ती लाल क्रेयॉनने रंगवा. काळ्या मार्करने पक्षाचे पाय काढा.
अशा प्रकारे सुरेख पॉली पॅरट तयार.

Image

तसं पेपा पिग सेरीजमधली सगळीच पात्रं काढायला सोपी आहेत. ती हळूहळू एकेक बनवून पहायची आहेत खरी. बघू कसं जमतं ते. ह्या कॅरॅक्टर्सची पपेट्स बनवून त्यांच्याशी खेळायला पण मुलांना आवडेल. तर ह्या पॉलीचही पपेट बनवता येईल.

पॉलीचं पपेटः
ह्या वर बनवलेल्या पॉलीच्या चित्रामागे अजून एक पेपर चिकटवायचा. तो चिकटवताना दोन्ही पेपरच्या मध्ये, मधोमध एक क्राफ्टस्टिक घालून (म्हणजेच दोन पेपर्सच्या मध्ये क्राफ्टस्टिक सँडविच करून) फेविकॉल/स्कूल ग्लू ने ती चिकटवायची. पॉलीचं पपेट तयार. हे पपेट अजून आकर्षक करण्यासाठी ते पॉलीच्या आकारानुसार कापून घ्या. मग तर आणखी छान दिसेल.

पेपा पिगचा पॉलीबरोबरचा हा एपिसोड,

 

गाजराची कोशिंबीर

उन्हाळ्यामध्ये जेवणात भाजीबरोबर एखादी कोशिंबीर असेल तर जेवणात जास्त मजा येते. त्यामुळे आजकाल घरी कधी काकडी, कधी गाजर, कधी टोमॅटो तर कधी चायोटीची कोशिंबीर केली जाते. आज गाजराच्या कोशिंबीरीची रेसिपी देत आहे.

साहित्यः ५-६ गाजरं, १ छोटा कांदा, लिंबू, दाण्याचं कूट, मीठ, साखर, कोथिंबीर,
फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी, जिरं, १-२ हिरव्या मिरच्या

कृती:
१) सालकाढणीने गाजराची सालं काढून गाजरं किसून घ्या. कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या. हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घ्या.
२) एका कुंड्यात(स्टीलच्या पातेल्यात/बाऊलमध्ये) गाजर, कांदा, कोथिंबीर एकत्र करा. त्यात दाण्याचं कूट घाला. मग ४-५ थेंब लिंबाचा रस घाला.
३) आता त्यात चवीनुसार मीठ, साखर घालून एकत्र ढवळून घ्या.
४) एका कढल्यात(अगदी छोट्या कढईत) थोडं तेल गरम करा. तेल गरम झालं की त्यात जिरं-मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात हिंग, मिरच्यांचे तुकडे घाला.
५) ही फोडणी आता गाजराच्या किसावर घालून एका डावाने नीट ढवळून घ्या. गाजराची कोशिंबीर तयार.

IMG_20140610_130452

फिंगर प्रिंटिंग ग्रिटिंग कार्ड

फिंगर प्रिंटिंग ग्रिटिंग कार्ड अर्थात बोटांच्या ठशांच्या नक्षीने बनवलेले शुभेच्छा पत्र 🙂

पुढच्या आठवड्यात शाळेत teachers appreciation week आहे. त्यानिमित्ताने टीचरसाठी कार्ड बनवले पिलूने माझ्या मदतीने. मुलांची अत्यंत आवडती activity, ती म्हणजे फिंगर पेंटिंग. बोटांच्या ठशांनी विविध आकार बनवायचे. करायला खूप सोपी आणि आकर्षक शुभेच्छापत्रं फिंगर पेंटिंगने बनवता येतात.

साहित्यः फिंगर पेंटिंगचे कलर्स (मी नेहमीचे वॉशेबल वॉटर कलर्स वापरले), ग्रिटिंग कार्ड बनवण्यासाठी पांढरा जाड कागद (कार्डस्टॉक पेपर), वॉटर कलर्सचे ब्रश, कात्री, बोटाचे रंग पुसायला कापड, मार्कर्स (स्केचपेन्स)

पांढरा जाड कागद मध्यभागी फोल्ड करून हव्या त्या आकाराचे शुभेच्छापत्र कापून घ्या. शुभेच्छापत्राच्या मुखपृष्ठाच्या मध्यभागी चॉकलेटी रंगाच्या मार्करने झाडाचा बुंधा आणि फांद्या काढा. आता हाताच्या बोटाच्या टोकाला हवा तो रंग ब्रशने लावून त्याचे ठसे मार्करने काढलेल्या झाडाच्या फांद्यांवर आणि आसपास उमटवा. हिच कृती बोटाला वेगवेगळे रंग एका पाठोपाठ एक लावून निरनिराळ्या रंगांचे ठसे झाडावर अणि आसपास उमटवा. आहे की नाही एकदम सोप्प. आणि खूपच सुंदर दिसतं हे झाडं.

 

IMG_20140508_175820

अशा प्रकारे बोटाच्या ठशाचे निरनिराळ्या रंगांचे, निरनिराळ्या आकाराचे ठसे कागदावर उमटवून सुंदर चित्र बनवता येतात. याच प्रकारे फुग्यांचा गुच्छ, फुलांचा गुच्छ, फुलांचा ताटवा, हार्ट शेप अशी वेगवेगळी डिझाइन्स बनवता येतील.
IMG_20140508_175836

IMG_20140508_180238

तिसरा वाढदिवस

ब्लॉगिंगचं हे तिसरं वर्ष.

या तीन वर्षाच्या वाटचालीत सहभागी झालेल्या सर्वांचे खूप आभार. वेळ काढून पोस्ट्सना लाइक्स आणि कमेंट्समार्फत अभिप्राय देणार्‍या सर्वांना खूप खूप धन्यवाद. तुमच्या प्रतिसादामुळे खूप छान वाटतं, नवं काही लिहायचा उत्साह नक्कीच वाढतो, प्रोत्साहन मिळतं.

Thanks blog

या वर्षी कदाचित थोड्या कमी पोस्ट्स झाल्या असाव्यात. पण एक नक्की ठरवलं होतं की शक्यतो लिहिण्यात खंड पडू द्यायचा नाही, मग भले महिन्यातून एकच पोस्ट का होईना, पण लिहायची. यावर्षीच्या बर्‍याच पोस्ट्स पाककृतींच्या आहेत. घरी बनवल्या जाणार्‍या, रोजच्या जेवणातल्या सोप्या सोप्या पाककृती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला त्या आवडतील अशी आशा आहे.

हा मी बनवलेला Strawberry Layer Cake खास तुमच्यासाठी.

Strawberry Layered Cake