माझे केकचे प्रयोग

माझे केकचे प्रयोग

महिन्या-दिडमहिन्यापूर्विची गोष्ट आहे ही. लेकीचा दुसरा वाढदिवस २-३ दिवसांवर आला होता. सगळी तयारी जवळजवळ झाली होती. वाढदिवस विकडे ला होता. आणि बर्थडे पार्टी विकेन्डला ठेवली होती. त्यामुळे विकडेला मोठं सेलेब्रेशन करायचं नसलं तरी तिला नविन ड्रेस घालणं, औक्षण करणं, जवळच्या २-३ बच्चे कंपनीला बोलावून केक कापणं असं करण्याचा प्लॅन होता. मनात असं खूप होतं की तिच्या वाढदिवसाला निदान छोट्या सेलेब्रेशनला केक आपणचं करायचा.
पण इथं केक येतोय कुणाला. मग म्हटलं मॉलमधून केक मिक्स घेउन येऊ आणि करून टाकू केक. हा.का.ना.का. त्याप्रमाणं केक मिक्सचं पॅकेट आणलं. घरी आल्यावर त्यावरची केक रेसिपी वाचली तर त्यात एग घाला असं लिहिलं होतं 😦  आता मूळात केकचं करायला येत नाही म्हंटल्यावर त्या केक मिक्सचा एग न घालता कसा केक बनवायचा, हे कसं जमावं. एग ऐवजी काय घालायचं कुणाला माहितं.
आता काय करावं बरं?
मग गुगलबाबाला पाचारणं केलं, म्हटलं, एगलेस केक शोधं बरं जरा. एक एगलेस रेसिपी ट्राय केली. मस्त झाला केक. मग थोडा उत्साह आणि कॉन्फिडन्स दोन्ही वाढला.
मग नेटावर नेटाने बरीच शोधाशोध सुरू केली एगलेस केक रेसिपीची. मला जनरली रेसिपी विडिओ आवडतात कारण एन्ड रिझल्ट लगेच पहायला मिळतो म्हणून 🙂  तशी १ छान रेसिपी मिळाली. लगोलग लिस्ट करून सर्व साहित्य आणण्यात आले आणि बर्थ-डे च्या दिवशी दुपारी केक करायला सुरूवात केली. रेसिपीची एक आणि एक स्टेप जशीच्या तशी फॉलो करण्यात आली. तरी मनात सारखं येत होतं, हे आपलं केक बॅटर काहीतरी वेगळंच दिसतयं :-/ आणि त्या केकवालीचं किती छान टेक्सचर आलयं केक बॅटरचं. का बरं असं दिसतयं हे, आपला पहिला केक तर छान झाला होता, त्याचं बॅटर असंच दिसत होतं ना त्या केकवालीसारखं. मग काय झालं आहे या वेळेला :-० कुणास ठाउक? मग म्हंटलं काही प्रमाण चुकलं असेल का. मग मनानीचं थोडे पदार्थ कमी जास्त घालून थोडी डागडुजी करण्याचा प्रयत्न झाला. मग म्हंटलं ठीक आहे. चला. ओव्हन्मध्ये ठेवू आता. केक तयार होऊन बाहेर येउन कुलिंग रॅक वर स्थानापन्न झाला. माझं परत कंपॅरिझन सुरू झालं तिचा केक, माझा केक. केक तसा छान झाला होता. चव पण वाइट नव्हती. पण माझा जरा जास्त कृष्णवर्णिय वाटतं होता. पण म्हंटलं होतं असं कधी कधी आपला या रेसिपीचा पहिलाचं प्रयोग आहे. मेंदीचा कोन करून त्यात बटर आयसिंग घालून केकवर नक्षी काढून झाली 🙂
केक गोंडस दिसत होता. हा असा,

संध्याकाळी बच्चे कंपनी आली. बर्थडे गर्लच आणि बाकी मुलांचही औक्षण झालं. केक कापला. मुलांनी आणि त्यांच्या आयांनी (माझ्या मैत्रिणींनी) केक खाल्ला.  मैत्रिणींनीही ‘चांगला झाला आहे बरं का केक’ असं म्हंटलं. (केक घरी केलाय हे सांगितल्यावर असं म्हणावचं लागत नां 🙂 ) आणि मुलांनी पण मागून मागून केक खाल्ला.
माझा उत्साह आणखी वाढला. आणि मनात आलं की विकेन्ड पार्टीला पण आपणच केक बनवायचा का. आता पार्टीला २/३ दिवस उरले होते. मी ठरवलं की मागचा केक काही फार ग्रेट झाला नाहीये. आता एखादी नवीन रेसिपी ट्राय करू. मग अजून एक रेसिपी शोधून काढली. आणि म्हंटलं आज ही करून पाहू. मग सामानाची जमवाजमव सुरू केली. रेसिपी करायच्या आधी मी टेबलवर/काउंटरवर सगळे घटक (इन्ग्रेडिअंट हो) काढून ठेवते. तेव्हा मैदा काढताना म्हंटलं परवाच केक केला आहे. सो मैद्याचे पॅक बाहेरच आहे. त्यातून मैदा काढताना सहज लक्ष गेलं माझं मैद्याच्या पॅककडं आणि युरेका युरेका… मला हसावं की रडावं कळेना. मग मी हसत सुटले आणि नवर्‍याला लगेच फोन करून ही गोष्ट सांगितली. तोही हसायला लागला. त्या पॅकवर ‘Rice Flour’ असं लिहिलं होतं 🙂 इन शॉर्ट मी मागच्या वेळेस तांदळाचा बर्थडे केक केला होता 😀 म्हणूनचं ते टेक्सचर वेगळं वगैरे वाटतं होत. आणि मी उगाच त्या केकावलीला आय मीन केकवालीला (मनातल्या मनात) नावं ठेवत होते. मग मनातल्या मनातचं  केकवालीला (आणि तांदळाचा केक खाल्लेल्या माझ्या मैत्रिणींना, बच्चेकंपनीला) सॉरी म्हणून घेतलं.
आता नव्या उमेदिने कामाला लागले आणि हाती घेतलेली रेसिपी पूर्ण केली. बेसिक चॉकलेट केक तयार झाला. हा असा,

यावेळी केक छान जमून आला. नवर्‍यालाही आवडला. आणि मनात ठरवलं की बस्स! विकेन्ड पार्टीला आपणचं केक बनवायचा! पण आता नेक्स स्टेप.. आता माझा आवडता एगलेस ब्लॅक फॉरेस्ट केक बनवायचा. मॉन्जिनीजची खूप आठवण आली. मॉन्जिनीजला मिस करत होते ना 😦 मग परत नेटवर शोधाशोध सुरू झाली. एगलेस ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री. पण ही पेस्ट्री काही मिळेना. पेस्ट्री म्हंटलं की स्नॅकचेच काहीबाही आयटम पेश व्हायला लागले :-/ मॉन्जिनीज केक/पेस्ट्री असं शोधून पण काही मिळेना. मग शेवटी ‘एगलेस ब्लॅक फॉरेस्ट केक’ चा शोध सुरू झाला. या विषयावर जोरदार R&D सुरू झाले. आणि बरीचं चांगली माहिती मिळत गेली.
नवर्‍याला काही अस्मादिक बर्थडे केक करणार असल्याचा बेत सांगितला नाही. कारण तो लगेच म्हणाला असता की नको नको तू काही करत नको बसू. आपण विकतच आणू केक. आपल्याला अजून पार्टीची तयारी करायची आहे वगैरे वगैरे. म्हणून मग ब्लॅकने (छुप्या पद्धतीने) ब्लॅक फॉरेस्टचे सर्व सामान घरी आणून ठेवले. आणि मग बर्थडेच्या दिवशी सकाळी प्लॅन जाहीर केला की मी (तुझ्या मदतीने – हे सायलेंट असतं ;-)) घरीचं केक करणार आहे. चांगला झाला तर संध्याकाळी हा केक कट करू. नाही झाला तर मग नवीन आणू.
मग खूप मेहेनत घेऊन, अहोंची (केक मिश्रण फेटायला) मदत घेऊन, त्याबदल्यात त्याला थोडे थोडे आयसिंग करायला देऊन 😉 एकदाचा केक सुफळ संपूर्ण झाला. आणि खरचं आमची मेहेनत फळाला आली आणि मस्त केक तयार झाला.
बा अदब, बा मुलाहिजा, होशिय्यार…… एगलेस ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री (बरीचशी माँजिनीज सारखी) येत आहे…

आणि हा फ्रीज मध्ये ठेवलेला केक मीच लहान होऊन सारखा सारखा फ्रीज उघडून पहात होते 🙂 आणि जेव्हा आमच्या छोट्या परीला हा केक दाखवला तेव्हा तर तिचा आनंद गगनात मावेना. ती नुसती तेतू, तेतू (केकू उर्फ केक) करून नाचायला लागली. तिची खुललेली कळी, फुललेला चेहेरा आणि तिच्या चेहेर्‍यावरून ओसंडून चाललेला आनंद बघून केकपायी केलेल्या सर्व कष्टाच सार्थक झाल्यासारखं वाटलं 🙂 आणि वाटलं की… ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ 🙂

तर असे होते माझे केकचे प्रयोग…
… (की माझी केक गाथा की केक कथा का केक पुराण ;-))  …. जे काहि असेल ते असो.

तर अशी ही साठा उत्तराची केक कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

टीपः  या वर दिलेल्या केकचा..
मेकिंग ऑफ ‘एगलेस ब्लॅक फॉरेस्ट केक’
हा एपिसोड पा.कृ. मध्ये लवकरच पोस्ट करीन 🙂

Advertisements

2 thoughts on “माझे केकचे प्रयोग”

  1. केक तर मस्तच जमलेला दिसतोय.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
    तुझं तर काही विशेष नाही, माझ्या बायकोने तर चक्क केक बिघडला( म्हणजे स्पंजी झाला नाही) म्हणून त्याचा पुन्हा गोळा करून लाटून चक्क शंकरपाळे केले होते. 🙂

  2. धन्यवाद महेंन्द्र आणि ब्लॉगवर स्वागत.
    hehe 🙂 सही किस्सा आहे. बाय द वे त्या योगे मला पण एक नवी पाककृती मिळाली.
    आता केक बिघडला तर काय करायचे असा प्रश्न पडणार नाही 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s