नॉर्थ कॅरोलिना झू

खूप दिवस मनात होते नॉर्थ कॅरोलिना झू पहायला जाउया, पिल्लूला पण मजा येईल झू पहायला. पण हिवाळ्यामुळे थांबावं लागत होतं. खूप थंडी ,बोचरं वारं आणि लहान दिवस यामुळं इतके दिवस हा बेत पुढे ढकलला जात होता.पण एप्रिलमध्ये टेंपरेचर चांगल सुधारू लागलं, पारा वर चढू लागला आणि दिवसही छान मोठा होत गेला. मग वेदर पाहिलं आणि ठरवलं की या विकांताला झू पहायचं, ७ एप्रिल २०१२.

झू ची साइट पाहिली. अगदी सविस्तर माहिती दिली होती. इथलं हे आवडतं आपल्याला. साइटवर अगदी इत्थंभूत माहिती दिली असते, की झू ला पोहोचायचे कसे, झू सुरू आणि बंद होण्याच्या वेळा काय आहेत, तिकिटांचे रेट काय आहेत, स्किम्स काय आहेत, तिथे काय काय अ‍ॅट्रॅक्शन्स आहेत, झूच्या आतील भागाचा मॅप, झूमध्ये कोणकोणती रेस्टॉरंट्स आहेत, त्याचा मेनू काय आहे, ‘what to bring’ लिस्ट, झू चे नियम, तिथे उपलब्ध असणार्‍या आणि नसणार्‍या सोयी-सुविधांची लिस्ट वगैरे वगैरे..

http://www.nczoo.org/
North Carolina Zoo (NCzoo)
4401 Zoo Parkway,
Asheboro, NC  27205

नॉर्थ कॅरोलिना झू चांगलचं मोठं आहे. त्याचे मुख्यत: २ भाग आहेत,
१) नॉर्थ अमेरिका रिजन
२) अफ्रिका रिजन
त्या त्या रिजन मध्ये तिथे तिथे आढळणारे प्राणी पहायला मिळतात. झू खूप मोठं असल्याने शक्यतो एका दिवशी एकच रिजन कव्हर होतो. आमचाही वन डे ट्रीपचा प्लॅन होता. मग अफ्रिका रिजनचे प्राणी जास्त इंटरेस्टिंग वाटल्याने तोच रिजन पहायचा ठरवला. शिवाय जिराफ डेक, डायनोसॉर चा 4-D शो आणि अ‍ॅनिमेट्रॉनिक डायनोसोर्स पहायचे हेही रडारवर होते. कॅरोसेल (आपलं मेरी गो राउंड असतं ना तसं) पण आहे तिथं. पण ते सगळीकडंच असतं म्हणून म्हंटलं वेळ मिळाला तरच कॅरोसेल राइड घेऊ.

असा सगळा बेत ठरला, तारीख ठरली. झू आमच्यापासून साधारण दीड-पावणेदोन तासावर आहे. ९ ते ५ अशी त्याची वेळ असल्याने घरातून सकाळी ७ ला निघण्याचा अतिमहत्वाकांक्षी प्लॅन केला 🙂 (तो तसाच बनवावा लागतो ;-)) त्याप्रमाणे सकाळी ६ वाजता डोळे चोळत उठलोही. मग चहा, आवराआवरी, पिल्लासाठी २/३ आलू पराठे बनवणे. अधेमधे पॅकिंग करणे. म्हणजेच पाणी-स्नॅक्स-कॅमेरा-छत्री इ.इ. वस्तू शिवाय छोटीचा खाऊ-स्नॅक्स-पराठे-पाणी-ज्यूस-कपडे हे सगळं  सॅकमध्ये भरणे. मग पिल्लाला उठवून दौडादौडा भागाभागासा करत तिचं आवरून, दूध पिण्यासाठी साम-दाम-दंड-भेद करत तिला काही खाऊ-पिऊ घालून एकदाचे ८:३० ला घरातून निघालो.

ट्रीप म्हंटलं ना की मला जाम मजा येते लहान मुलासारखी. आपण कुठेतरी मस्त भटकायला चाललो आहोत म्हणून मी खूष असते. सकाळचा मस्त गारवा होता. ट्रॅफिक पण कमी होतं. कारमध्ये आवडीच्या गाण्यांची सिडी लावली होती. तासाभराने सबवे ला थांबून मस्त सँडविच खाल्लं. वेजिटेरिअन लोकांसाठी सबवे ही खूप छान सोय आहे. हेल्दी आणि टेस्टी. आता साधारण दहा वाजले होते.

मग परत झूच्या दिशेने आगेकूच. पण जसं झू जवळ येऊ लागलं, झूपासून अगदी १-२ mile अंतरावर आलो, तसं गाड्यांची गर्दी वाढू लागली. आणि पुण्याच्या हिंजवडीला जसं वरातीतून गेल्यासारखी गाडी चालवावी लागते तशी गाडी चालवावी लागतं होती. कारण सगळेच जण बच्चे कंपनीला घेऊन (गर्दी टाळायला म्हणून ;-)) लवकर येऊन पोचले होते.

झालं. पार्किंगपर्यंत जायला अर्धा तास आणि तिथून पुढे परत तिकिट काढायला भली मोठी रांग. वर उन्हाचा तडाखा. तिकिटं काढून प्रवेश मिळवायला जवळजवळ दीड तास लागला. शेवटी साडेबाराला आत पोचलो. मग थोडं फ्रेश होऊन मस्तपैकी झू फिरलो, जिराफ डेक पाहिला. तिथे जाऊन जिराफांना झाडाचा पाला खाऊ घालण्याचा कार्यक्रम झाला. खूप मजा आली आणि खूप जवळून जिराफ पहायला मिळाले. खरचं इतका राजबिंडा असतो हा प्राणी. तेव्हापासून जिराफ माझा एकदम फेवरेट प्राणी झाला.
मग सिंह, झेब्रे, शहामृग, हरिण, गेंडे, अफ्रिकन हत्ती, गोरिला, लेमूर(माकडाची एक जात), फ्लेमिंगो असे भरपूर प्राणी-पक्षी पाहिले. मजा आली.

नंतर मग डायनो 4-D शो पाहिला. सह्ही.. होता. त्यानंतर अ‍ॅनिमेट्रॉनिक डायनोसोर्स चा छोटा पार्क पाहिला. काय सही बनवलेत डायनोसोर्स. मस्तच. बच्चेकंपनीला तर खूप आवडले. अगदी खर्‍या डायनोसोर सारखे दिसतात आणि (एका जागीच) मुव्हमेंट करतात, हात हलवतात, डोक हलवतात, डोळे फिरवतात, आवाज काढतात, काही डायनोसोर तोंडातून पाणी फवारतात (स्पिटिंग डायनोसोर) . मस्तच. डोळे तर इतके जबरी केलेत की काही काही डायनो आपल्याकडेच पहात आहेत असं वाटतं… 🙂

अशी मस्त सफर करून आणि एक छानसे सोवेनिअर घेऊन मग (परत ती सकाळची गर्दी नको म्हणून) झूच्या बंद व्हायच्या वेळेच्या अर्धा तास आधीच बाहेर पडलो आणि लगेच हायवे ला लागलो. परत एकदा सकाळचेच सबवे गाठले आणि १-१ फूटलाँग सँडविच फस्त करून परतीच्या वाटेवर निघालो. आणि ७ च्या सुमारास घरी परतलो. आणि भरल्या पोटी मस्त ताणून दिली 🙂

फोटो गॅलरी:

1) माझे लाडके जिराफ 🙂

2) अ‍ॅनिमेट्रॉनिक डायनोसोर्स:

3) झू मधले इतर प्राणी

Advertisements

One thought on “नॉर्थ कॅरोलिना झू”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s