श्रीखंड

साहित्यः
दही, बारीक केलेली साखर, केशर, पिस्ते-बदामाचे तुकडे, (मोठ्या  छिद्राची) धान्य चाळायची चाळणी, (ही चाळणी ज्यावर बसेल असे) पातेले

कृती:
१) एका सुती कापडाची मोठी चौकोनी घडी करून घ्या. कापडाच्या मध्यभागी दही ओतावे आणि कापडाची चारी टोकं एकत्र बांधून हे कापडात बांधलेले दही टांगून ठेवा.
२) साधारण १०-१२ तासानंतर दह्यातले बरेच पाणी गळून गेले असेल. ह्या घट्ट दह्याला चक्का असं म्हणतात. हा चक्का एका बाऊलमध्ये काढून घ्या. केशराच्या काड्या हाताने चुरून एका छोट्या वाटीत ठेवा.
३) एक चाळणी घेऊन ती एका पातेल्यावर ठेवावी. चक्का थोडा थोडा चाळणीमध्ये घेऊन हाताच्या बोटांनी दाब देत गोलाकार पसरत रहावा.  (म्हणजे चक्का चाळला जाऊन एकजिनसी श्रीखंड तयार होईल.) हे करताना अधेमधे चक्क्यावर साखर, केशराचा चुरा घालत रहा.
४) पातेल्यामध्ये एकजिनसी श्रीखंड तयार झालेले असेल. श्रीखंडाची चव पाहून त्यात चवीनुसार गरज वाटल्यास आणखी साखर घाला. मोठ्या चमच्याने/डावाने श्रीखंड ढवळून एकजीव करा.
५) एका बाऊलमध्ये श्रीखंड घेऊन केशराच्या काड्या आणि बदाम/पिस्ते वापरून सजवा.

टीपा:
१) दही बांधून ठेवायला सुती कापड किंवा कॉटनची धुतलेली जुनी ओढणी वापरता येईल.
२) काही जण केशर वापरायच्या आधी तव्यावर्/कढल्यामध्ये थोडं गरम करून घेऊन चुरतात. त्यामुळे ते पदार्थात चांगल मिसळतं असं म्हणतात.

Image

Image

Advertisements

सोप्पे पेढे

पुण्यामध्ये असताना चितळेंचे पेढे नेहमीच या ना त्या कारणाने घरी यायचे. कोणाच्या परीक्षेतील यशाच्या सेलिब्रेशनचे, कोणाच्या गोड बातमीचे, कधी नातेवाईकांकडून खाऊ म्हणून. तेव्हा कधी पेढ्यांचं फार अप्रूप नाही वाटलं (कारण मुबलक उपलब्ध होते म्हणून :-))
पण इथे भारताबाहेर तितके छान पेढे नाही मिळत. मग चितळेंच्या पेढ्यांची आठवण यायची. चितळेंची बाकरवडी आणि बाकी इतर इंस्टंट पिठं इथे मिळतात. पण चितळे मिठाई नाही मिळत अजून.
मग माझ्या एका मैत्रिणीने, प्रज्ञाने मला ही एकदम सोपी पेढ्यांची रेसिपी सांगितली. नक्की करून पहा. हे पेढे खूप छान लागतात अगदी भारतात मिळतात त्या पेढ्यांसारखे.
Thanks Pradnya for the wonderful Recipe 🙂

साहित्यः
१ स्टिक अनसॉल्टेड बटर, २ कप मिल्क पावडर, १४ Oz (३९६ ग्रॅम) चा स्वीटन्ड कन्डेन्स्ड मिल्कचा १ कॅन, १ टीस्पून / १ चमचा  दूध,  अर्धा टीस्पून केशराच्या काड्या, पाव टीस्पून वेलदोडा पूड आणि पाव टीस्पून जायफळ पूड (ऑप्शनल)

कॄती:
१) एका मायक्रोवेवेबल ग्लास बाऊलमध्ये बटर घेऊन ते अंदाजे ३०-३५ सेकंद मायक्रोवेवमध्ये ठेवून मेल्ट करून घ्यावे. मग त्यात कन्डेन्स्ड मिल्क घालून मिश्रण डावाने/चमच्याने ढवळून एकत्र करून घ्यावे.
२) दुसर्‍या एका मायक्रोवेवेबल छोट्या बाऊलमध्ये केशर व दूध एकत्र करून मायक्रोवेवमध्ये १०  सेकंद गरम करून घ्या. हे दूध आता मोठ्या बाऊलमधल्या मिश्रणात घाला.
३) मग त्यात मिल्क पावडर घालून मिश्रण एकत्र ढवळून चांगले एकजीव करा.
४) मग हा बाऊल १ मिनिट मायक्रोवेवमध्ये ठेवा. त्यानंतर बाऊल बाहेर काढून मिश्रण खालपासून वरपर्यंत नीट आणि भरपूर ढवळून घ्या. म्हणजे मिश्रण एकसारखे कुक होईल. बाउलच्या कडांना लागलेले मिश्रण डावाने खरवडून परत मिश्रणात घाला.
५) स्टेप नं. ४ ही ३-४ वेळा रिपीट करा.
६) आता मिश्रण थोडेफार घट्ट झाले असेल. हे मिश्रण (वाफ बाहेर जायला जागा राहील अशा प्रकारे) झाकण ठेवून १०-१५ मिनिटे थंड होऊ द्या.
७) पेढे वळायला येतील इतपत मिश्रण कोमट झाले की एका ताटाला बटरचा किंवा तूपाचा हात लावून त्यात एकसारख्या आकाराचे गोल पेढे वळून ठेवा. आपल्याला जो आकार आवडतो तसे पेढे तयार करून गार होऊ द्यावेत.
८) आवडत असेल तर एका ताटलीत बारीक साखर घेऊन, पेढा तयार झाला की लगेच त्यात घोळवून ठेवावा. तसे पेढेही छान लागतात.

pedhe2

IMG_3059

टीपः
१) १ स्टिक अनसॉल्टेड बटर = १/२ कप अनसॉल्टेड बटर = ८ टेबलस्पून अनसॉल्टेड बटर
२) जो मायक्रोवेवेबल ग्लास बाऊल घ्याल तो बर्‍यापैकी मोठा घ्या जेणेकरून मिश्रण उतू जाणार नाही. म्हणजे जितके कप मिश्रण तयार झाले आहे त्याच्या दुप्पट मिश्रण मावू शकेल साधारण इतका मोठा बाऊल घ्या.
३) मिश्रण ढवळताना लाकडी डाव मला जास्त उपयोगी पडला.
४) माझा मायक्रोवेव ९०० वॅटचा आहे. मायक्रोवेवच्या वॅट पॉवरनुसार पदार्थ मायक्रोवेवमध्ये ठेवण्याचा कालावधी कमी-जास्त होतो.

कणकेचे लाडू

माझे अत्यंत आवडते लाडू. पोटभरीचे, चविष्ट आणि पौष्टीकसुद्धा.
बच्चेकंपनी हे लाडू खाउन खूष होते. ‘ऑन द गो’ स्नॅक्स साठी एकदम छान आणि सुटसुटीत ऑप्शन.

साहित्यः  १ कप गव्हाचे पीठ, अर्धा कप तूप, पाऊण कप पिठी साखर, चिमूटभर वेलदोडे पूड,               बेदाणे (ऑप्शनल)

कृती:
१) एका पॅनमध्ये तूप घेऊन ते गरम करत ठेवा. तूप गरम झाले की त्यात गव्हाचे पीठ घालून तूपावर परता.
२) ५-१० मिनिटं मध्यम गॅसवर गव्हाचे पीठ अधेमधे परतून चांगले भाजून घ्या.
३) गॅस बंद करून त्यात साखर, वेलदोडे पूड घालून चांगले हलवून मिक्स करून घ्या.
४) मिश्रण लाडू वळण्याइतकं कोमटं झालं की लाडू करायला घ्या. प्रत्येक लाडू वळताना त्याला १ बेदाणा लावा.  असे सोपे आणि पौष्टीक लाडू तयार 🙂

दुधी हलवा (दुधी भोपळ्याची खीर)

दूधी भोपळा तब्येतीला चांगला असतो. पौष्टीक असतो. अशा या पौष्टीक दूधी भोपळ्याचा हलवा खूपच छान लागतो. नक्की करून पहा. कृती सोपी आहे पण वेळखाऊ आहे.

साहित्यः दोन वाट्या किसलेला दुधी भोपळा, ७-८ वाट्या दूध, १ वाटी साखर, २-४ चमचे तूप, वेलची पूड व  काजूचे तुकडे (ऑप्शनल)

कृती:
१) सालकाढणीने दुधी भोपळ्याची सालं काढून तो किसून घ्यावा.
२) एका पॅनमध्ये थोडसं २-४ चमचे तूप घेऊन मंद आचेवर पॅन गरम करत ठेवा.
३) तूप थोडं गरम झाल की पॅनमध्ये थोडे काजू टाकून तूपावर चांगले परतून घ्या.
गॅस मंद आचेवर असू द्या. अन्यथा काजू करपतील.
४) आता त्यात दूधी भोपळ्याचा किस घालून मध्यम आचेवर चांगला परता.
५) २-४ मिनिटांनी त्यात ६ वाट्या दूध घाला आणि पॅनवर झाकण न ठेवता मध्यम आचेवर दूधी  चांगला
शिजू द्या. दूधी चांगला शिजण्यासाठी दूध जास्त हवे आहे असे वाटल्यास पॅनमध्ये अजून थोडे दूध घाला.
६) हे मिश्रण अधे-मधे परतत रहा. मिश्रणातले दूध आटून मिश्रण घट्ट झाले की त्यात साखर, वेलची पूड
घाला.
७) पुन्हा एकदा मिश्रण आटून चांगले घट्ट झाले की गॅस बंद करा. गरमागरम दूधी हलवा तयार.

टीपः
१) (खवा न वापरता) दूधी हलवा बनवणे हे चांगले वेळखाऊ काम असल्याने स्वयंपाक करतना अगदी सुरूवातीला दूधी किसून एका गॅसवर दूधी हलवा
बनवायला घ्यावा. स्वयंपाक होईपर्यंत दूधी हलवा तयार होतो. फक्त अधेमधे दूधी परतत रहायचे.
२) या पद्धतीने दूधी हलवा बनवायला साधारण अर्धा तास लागतो.
३) दूधी भोपळ्याची खीर बनवायची असेल तर दूधी चांगला शिजला की त्यात वेलची पूड आणि साखर घालावी. मिश्रण आटवण्याची/ घट्ट होऊ देण्याची आवश्यकता नाही.
४) साखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करावे.