पनीर (स्टफ्ड) पराठे

पनीरचे पराठे कधी केले नव्हते. एकदा करून पहायचे होते. मग माझ्या एका मैत्रिणीने, तृप्तीने मला ही रेसिपी सांगितली. त्या रेसिपीने पराठे करून पाहिले. पराठे चांगले झाले. कमी मिरची घातल्यास लहान मुलेही हे पराठे आवडीने खातील. जेवणाच्या डब्यामध्ये देण्यासाठी चांगला ऑप्शन आहे. आणि त्या मानाने हे पराठे कमी वेळात तयार होतात.

साहित्यः
किसलेले पनीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरेपूड, धनेपूड, मीठ, आलं पेस्ट (किसलेलं आलं), बारीक चिरलेली हिरवी मिरची (हिरवी मिरची पेस्ट), पोळीसाठी मळलेली कणिक (गव्हाच्या पिठाची)

कृती:
१) एका कुंड्यामध्ये/बाऊलमध्ये पनीर, जिरेपूड, धनेपूड, मीठ, किसलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची घेऊन एकत्र मिक्स करून घ्या. मिश्रण चांगलं मळून घ्या.
२) या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून नीट मिक्स करून घ्या. पराठ्याचे सारण तयार.
३) तवा तापायला ठेवा. कणिकेचे छोटे गोळे करून घ्या.
४) तवा चांगला गरम झाला की कणकेचा एक गोळा घेऊन त्यामध्ये पराठ्याचे सारण भरून (स्टफ करून) तो गोळा लाटून घ्या.
५) ही लाटलेली पोळी (लाटलेला स्टफ्ड पराठा) तव्यावर दोन्ही बाजूनी छान भाजून घ्या.
६) तयार गरम पराठा दही/बटर/तूप आणि शेंगदाण्याची चटणी/टोमॅटो केचप/लोणचं याबरोबर खा.

IMG_20140129_131235

IMG_20140129_131249

IMG_20140129_135228

IMG_20140129_135336

Advertisements

कणकेची (गव्हाच्या पिठाची) झटपट आणि सोपी धिरडी

साहित्य: गव्हाचे पीठ (कणिक), तिखट, मीठ, हळद, बारीक किसलेला लसूण, जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) एका मोठ्या बाउलमध्ये गव्हाचे पीठ (कणिक) घेऊन त्यात थोडी हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर, लसूण घाला. मग त्यात पाणी घालून दोस्याच्या पिठाइतके दाट मिश्रण बनवा.
२) तयार मिश्रणाची छान पातळ धिरडी तेल लावलेल्या निर्लेप तव्यावर खोल डावाने घाला. झाकण ठेवा.
३) धिरडी दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्या आणि तूप/बटर घालून आवडेल त्या चटणी बरोबर वाढा.
(चटणी शिवायही तितकीच छान लागतात. म्हणून चटणी नसली तर नुसत्या तूपाबरोबरही छान लागतात.)

टिपः- या मिश्रणाची धिरडी घालताना थोडे विशेष कौशल्य अशासाठी लागते की धिरडी तव्यावर घातल्यानन्तर, एका कुंड्यात/बाउलमध्ये घेतलेल्या पाण्यात हात बुडवून त्या हाताने गरम धिरडे पसरावे लागते तरच ते पातळ आणि जाळीदार होते. अन्यथा ते जाडसर होते.
जर या पद्धतीने धिरडं हाताने पसरता येत नसेल तर धिरड्याचे मिश्रण थोडं पातळ बनवून मग खोल डावाने / ग्लासने (तव्याच्या परिघापासून मध्यापर्यंत डाव गोल गोल फिरवत) धिरडी घाला.

IMG_0425

IMG_0427

२) मूगाच्या डाळीची खिचडी – प्रकार २

हा एकदम सोपा प्रकार आहे. साहित्य पण मोजकं आणि पटकन होते ही खिचडी. मस्त लागते. पचायला हलकी असते. लहान मुलांसाठी करायची असल्यास कमी तिखट करावी आणि पाणी थोडं जास्त घालावं.

साहित्यः तांदूळ १ वाटी, पिवळी मूगडाळ अर्धी ते पाऊण वाटी (आवडीनुसार), तिखट, मीठ, गोडा मसाला,
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, थोडंसं जिरं, कढिलिंब (ऑप्शनल)

कृती:
१) तांदूळ आणि डाळ एकत्र धुवून निथळत ठेवावे.
२) एका स्टीलच्या कुकरमध्ये थोडं तेल तापत ठेवावे. तेल तापले की त्यात मोहरी, जिरं, हिंग, हळद, कढिलिंब घालून फोडणी करावी.
३) आता त्यात डाळ-तांदूळ घालून १-२ मिनिटं परतून घ्या. मग त्यात ३ वाट्या पाणी घाला. चवीनुसार तिखट, मीठ, गोडा मसाला घाला. कुकरच्या ३ शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा.
४) गरम गरम मूगाच्या डाळीची तयार. खिचडीवर तूप घालून दही/ताक, पापड, आंब्याचे लोणचे यापैकी कशाही बरोबर खा.

कशी वाटली ही रेसिपी आणि करून पाहिली का, कशी झाली, आवडली का हे ऐकायला नक्की आवडेल 🙂

तांदळाची उकड (लहानांचा खाऊ)

हा पदार्थ मला लहानपणी खूप आवडायचा. आई बरेच वेळा आमच्यासाठी उकड बनवायची. लहान मुलांना देण्यासाठी एकदम हेल्दी आणि टेस्टी आणि करायला सोपा पदार्थ. अगदी ५-१० मिनिटात तयार होतो आणि पौष्टीक, पोटभरीचा ऑप्शन आहे.

अगदी दीड-दोन वर्षाच्या मुलांना पण खाऊ घालू शकतो. फक्त एवढ्या लहान मुलांसाठी उकड बनवताना अगदी कणभर मिरची घालावी, म्हणजे मिरचीची चव तर लागेल पण उकड अजिबात तिखट लागणार नाही.

साहित्यः
तांदूळाची पिठी ३ टेबलस्पून, कढिलिंबाची २-३ पानं, मीठ, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर
आंबटपणासाठी २-३ थेंब लिंबूरस किंवा १-२ चमचे किंचित आंबट दही
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, (बोटाच १ पेर) मिरची दोन तुकडे करून
(या साहित्यात अंदाजे ३-४ वाट्या उकड तयार होईल)

कृती:
१) प्रथम एका बाऊलमध्ये तांदळाची पिठी घेऊन त्यात ३ वाट्या पाणी घाला. आंबटपणासाठी दही वापरणार असाल तर तेही यात घाला. पिठाच्या गुठळ्या रहाणार नाहीत इतपत मिश्रणात एकजीव करून घ्या.
२) एका पॅनमध्ये तेल घेऊन मध्यम आचेवर तेल तापत ठेवा. तेल तापले की त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात अनुक्रमे हिंग, हळद , कढिलिंब, मिरची घालून परता. मग त्यात तांदूळ पिठीचे मिश्रण घाला. आणि डावाने ढवळत रहा.
३) आता त्यात (स्टेप १ मध्ये दही घातले नसेल तर) लिंबू रस घाला. मग चवीनुसार मीठ, साखर घाला. कोथिंबीर घाला. मिश्रण अधेमधे ढवळत रहा. अन्यथा पिठाच्या गुठळ्या होतील.
४) लवकरच मिश्रण दाट होऊ लागेल. उकड अजून थोडी पातळ हवी असेल तर त्यात गरजेनुसार पाणी घालून परत मिश्रण एकसारखे करून घ्या.
५) परत एकदा चव पाहून चवीनुसार (मिरची, मीठ, साखर, लिंबूरस/दही) यापैकी जे हवे असेल ते घाला.
६) गरम गरम उकड वरून तूप घालून खा 🙂

टीपः
१) तांदळाची पिठी पाणी घालून शिजवल्यानंतर बरीच दाट होते. त्यामुळे २-३ टेबल्स्पून तांदळाची  पिठी घेतली तरी त्याची २-३ वाट्या पातळ उकड तयार होते.
२) लहानांसाठी करायची असल्यास पातळ करावी. मोठ्यांसाठी करायची असल्यास दाट केली तरी चालेल.

कशी वाटली ही रेसिपी आणि तुम्ही करून पाहिली का, हे ऐकायला नक्की आवडेल 🙂

कणकेचे लाडू

माझे अत्यंत आवडते लाडू. पोटभरीचे, चविष्ट आणि पौष्टीकसुद्धा.
बच्चेकंपनी हे लाडू खाउन खूष होते. ‘ऑन द गो’ स्नॅक्स साठी एकदम छान आणि सुटसुटीत ऑप्शन.

साहित्यः  १ कप गव्हाचे पीठ, अर्धा कप तूप, पाऊण कप पिठी साखर, चिमूटभर वेलदोडे पूड,               बेदाणे (ऑप्शनल)

कृती:
१) एका पॅनमध्ये तूप घेऊन ते गरम करत ठेवा. तूप गरम झाले की त्यात गव्हाचे पीठ घालून तूपावर परता.
२) ५-१० मिनिटं मध्यम गॅसवर गव्हाचे पीठ अधेमधे परतून चांगले भाजून घ्या.
३) गॅस बंद करून त्यात साखर, वेलदोडे पूड घालून चांगले हलवून मिक्स करून घ्या.
४) मिश्रण लाडू वळण्याइतकं कोमटं झालं की लाडू करायला घ्या. प्रत्येक लाडू वळताना त्याला १ बेदाणा लावा.  असे सोपे आणि पौष्टीक लाडू तयार 🙂