कोबी भात

कोबी.. त्याच्या उग्र वासामुळे मला लहानपणी विशेष आवडत नसे.पण नंतर नंतर कोबीची भाजी, पचडी, पराठे आवडू लागले. अशीच कोबीची आणखी एक रेसिपी म्हणजे कोबी भात. ह्या भाताला खूप छान चव असते. कोबी फारसा न आवडणार्‍यांनाही हा भात आवडेल.

साहित्य – चिरलेला कोबी ४ कप (बारीक चिरलेला नाही. साधारण चायनीज डीश/पदार्थ बनवताना आपण चिरतो तसा.), १ कप तांदूळ, १/८ कप मूगडाळ, २ टीस्पून धनेपूड, ४ टीस्पून तेल, १ टीस्पून मोहरी, १/२ टीस्पून जिरं, चवीनुसार मीठ, १/४ कप भाजलेले/तळलेले शंगदाणे, ८-१० कडिपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग, २ टीस्पून बारीक चिरलेला लसूण, १ टीस्पून तिखट, १/४ टीस्पून हळद, २ टीस्पून लिम्बूरस, १/४ कप मटाराचे दाणे, १.५ ते २ कप पाणी, १ टीस्पून तूप

कृती:
१) तांदूळ, मूगडाळ धूवून निथळत ठेवा.
२) एका कुकरमध्ये तेल घेऊन त्यात जिरे-मोहरी, कढिपत्ता, हिंग घालून फोडणी करा.
३) त्यात लसूण घालून परता. मग हळद, चिरलेला कोबी, मटार घालून परता. मग डाळ-तांदूळ घालून परता.
४) आता त्यात तिखट, मीठ, धनेपूड, लिंबू ज्यूस घाला. आवडत असल्यास १ चमचा तूप घाला आणि परता.
५) त्यात दीड ते दोन कप पाणी घाला. परत एकदा चवीनुसार तिखट, मीठ, लिंबू घालून कुकरला झाकण लावून ३ शिट्ट्या करा.
६) गरमा-गरम कोबीभातावर शेंगदाणे घालून खा.

Kobi bhat 25 Jan 2013

Advertisements

२) मूगाच्या डाळीची खिचडी – प्रकार २

हा एकदम सोपा प्रकार आहे. साहित्य पण मोजकं आणि पटकन होते ही खिचडी. मस्त लागते. पचायला हलकी असते. लहान मुलांसाठी करायची असल्यास कमी तिखट करावी आणि पाणी थोडं जास्त घालावं.

साहित्यः तांदूळ १ वाटी, पिवळी मूगडाळ अर्धी ते पाऊण वाटी (आवडीनुसार), तिखट, मीठ, गोडा मसाला,
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, थोडंसं जिरं, कढिलिंब (ऑप्शनल)

कृती:
१) तांदूळ आणि डाळ एकत्र धुवून निथळत ठेवावे.
२) एका स्टीलच्या कुकरमध्ये थोडं तेल तापत ठेवावे. तेल तापले की त्यात मोहरी, जिरं, हिंग, हळद, कढिलिंब घालून फोडणी करावी.
३) आता त्यात डाळ-तांदूळ घालून १-२ मिनिटं परतून घ्या. मग त्यात ३ वाट्या पाणी घाला. चवीनुसार तिखट, मीठ, गोडा मसाला घाला. कुकरच्या ३ शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा.
४) गरम गरम मूगाच्या डाळीची तयार. खिचडीवर तूप घालून दही/ताक, पापड, आंब्याचे लोणचे यापैकी कशाही बरोबर खा.

कशी वाटली ही रेसिपी आणि करून पाहिली का, कशी झाली, आवडली का हे ऐकायला नक्की आवडेल 🙂

मूगाच्या डाळीची खिचडी – प्रकार १

माझी मैत्रिण ह्या प्रकारची मूगडाळ खिचडी करते. मी तिच्याकडे ही खिचडी १-२ दा खाल्ली. मला हा प्रकार आवडला. छान लागतो. वन डीश मील साठी छान, सोपा, टेस्टी ऑप्शन. नक्की करून पहा. ही खिचडी कमी तिखट केली तर लहान मुलं पण आवडीने खातात. लहान मूलांना द्यायला हा एक हेल्दी ऑप्शन आहे.

साहित्यः
पाव वाटी तेल, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, कढिलिंबाची ४-५ पानं, २/३ पाकळ्या लसूण बारीक चिरून किंवा किसून (साधारण १ टीस्पून), कच्चे/भाजलेले  शेंगदाणे पाव वाटी, सुकं खोबरं अर्धी वाटी, गोडा मसाला अर्धा टीस्पून,  तिखट अर्धा टीस्पून,  तांदूळ १ वाटी,  पाऊण वाटी हिरवी (स्प्लिट) मूगडाळ,  १ टीस्पून मीठ, ४ वाट्या पाणी
(इथे १ वाटी = १ आमटीची मोठी वाटी असे प्रमाण घेतले आहे)

कृती:
१) एका स्टीलच्या कुकरमध्ये तेल गरम करत ठेवावे. एकीकडे तांदूळ आणि मूगाची डाळ धुवून ठेवावी.
२) तेल गरम झाले की त्यात जिरे, मोहरी, हिंग घालून फोडणी करावी. आता त्यात शेंगदाणे, कढिलिंब,       लसूण घाला.शेंगदाणे परतून घ्या. मग सुकं खोबरं घाला. हळद घाला. मग तांदूळ आणि मूगाची डाळ घाला. चांगले परता.
३) आता त्यात पाणी, तिखट, मीठ, गोडा मसाला घाला. आवडत असल्यास १ चमचा तूप घाला.
४) कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर ३ शिट्ट्या होऊ द्या.
५) १५ मिनिटांनी कुकरचे झाकण पडले/निघाले की गरम गरम मूगाच्या डाळीची खिचडीवर तूप घालून लोणचे, दही, भाजलेला/तळलेला पापड ह्या बरोबर खा.

टीपः
लहान मुलांसाठी मऊ खिचडी करणार असल्यास या पाककृतीत ४ वाट्या ऐवजी ६ वाट्या पाणी घालावे आणि तिखट, गोडा मसाला कमी घालावा.

पावभाजी

पावभाजी … सगळ्यांची फेवरेट डिश…
मला पण खूप आवडते पावभाजी. एकदम टेस्टी आणि दमदमीत. ‘वन डिश मील’ साठी उत्तम ऑप्शन.
आज त्याचीच पाककृती देत आहे.

साहित्यः
उकडलेला बटाटा, तिखट, मीठ, बटर, तेल, पावभाजीचे ब्रेड/पाव, हिरव्या मिरच्या
भाज्या: गाजर, फ्लॉवर, मटार, श्रावण घेवडा(ग्रीन बीन्स), भोपळी मिरची,
बारील चिरलेले आणि वेगवेगळ्या बाउलमध्ये ठेवलेले (कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर)
पावभाजी मसाला (मी एवरेस्टचा वापरते)

कृती:
१) कुकरमध्ये बटाटा उकडून घ्यावा. त्यानंतर सर्व भाज्या (गाजर, फ्लॉवर, मटार, श्रावण घेवडा(ग्रीन बीन्स), भोपळी मिरची), व १-२ मिरच्या कुकरमध्ये एकत्र उकडून घ्याव्यात.

२)एका मोठ्या पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला लसूण परतून घ्यावा. मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परता. मग बारीक चिरलेला टोमॅटो घालून परता. मग बारीक चिरलेलं आलं घालून परता.

३) आता त्यात तिखट, पावभाजी मसाला घाला. २-३ चमचे बटर घालून परता. शिजवलेल्या भाज्या घालून परता. आता त्यात चवीनुसार तिखट, मीठ, पावभाजी मसाला घालून परता. आता पाणी घालून पावभाजी पातळ करून घ्या.

४) पॅनवर झाकण ठेवून एक उकळी आणा. मग थोडे बटर घालून, झाकण ठेवून परत १ उकळी आणा. पावभाजी तयार 🙂

५) बटर लावून पाव तव्यावर भाजून घ्या. पावभाजी च्या भाजीवर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालून, लिंबू पिळून, पावासोबत खा.

टीपः
१) कांदा आणि लसूण भरपूर वापरा. त्यामुळे छान टेस्ट येते.
२) आवडत असेल तर पावभाजीमध्ये खायचा लाल रंग किंचित घालावा.