पार्टी गेम्स

एखाद्या कार्यक्रमाला, गेट-टूगेदरला सगळे एकत्र जमले की खूप मजा येते. खाणे-पिणे, हॅ हॅ हू हू करणे, गप्पाटप्पा, पत्ते खेळणे अशा सगळ्या धमाल गोष्टी होतात. अशा वेळी काही पार्टी गेम्स ठेवले असतील तर मस्तच. छोटा ग्रुप असेल तर हे गेम्स खेळायला अजून मजा येते.
असेच काही मनोरंजक पार्टी गेम्स इथे देत आहे.

(१) १ मिनिट गेम्सः
या खेळांमध्ये एका मिनिटात एखादी गोष्ट करायची असते. जे कोणी ती गोष्ट दुसर्‍यापेक्षा जलद करेल ती व्यक्ति जिंकते असा साधा सोपा गेम.

१) स्ट्रॉ गेमः
यामध्ये प्रत्येकाला दोन पसरट बाऊल, एक स्ट्रॉ दिला जातो. एका बाऊलमध्ये मूठभर चवळीचे दाणे ठेवले जातात. स्ट्रॉमधून हवा ओढून चवळीचे दाणे स्ट्रॉ वापरून एका बाऊलमधून दुसर्‍या बाऊलमध्ये टाकणे.

२) छोटे फुगे फुगवणे:
एका मिनिटात जास्तीत जास्त फुगे फुगवणे आणि प्रत्येक फुगवलेल्या फुग्याला गाठ मारणे.

३) पत्त्याची घरं:
दोन पत्त्यांच एक घरं अशी, एका मिनिटात पत्त्यांची जास्तीत जास्त घरं बांधणे.

४) बादली/टब आणि बॉल्सः
एखाद्या कॉफी टेबलवर २ बादल्या  किंवा टब ठेवून, त्यापासून ५/१० फूट लांब उभं राहून एका मिनिटात जास्तीत जास्त बॉल्स बादली/टबमध्ये टाकणे.

५) मेमरी (स्मरणशक्ती) गेमः
एका टेबलवर एका टेबलक्लॉथवर अनेक वेगवेगळ्या वस्तू ठेवणे (जसं की कात्री, वही, पेन, चमचा, सॉफ्ट टॉय, टूथपेस्ट, लाटणं, रिमोट, वाटी, सेलोटेप, किल्ली, बॉल इ.इ.) आणि ३० सेकंदामध्ये त्या वस्तू लक्षात ठेवणे. नंतर टेबलक्लॉथ (आतल्या वस्तूंसह उचलून) दुसरीकडे ठेवणे. आता ३० सेकंद वेळ देऊन त्या वेळात ज्या आठवतील त्या जास्तीत जास्त वस्तूंची नावं लिहून काढणे.

६) चमचा आणि काचेच्या गोट्या/पेबल्स (किंवा सुपार्‍या किंवा गारगोट्या किंवा सागरगोट्या):
यामध्ये प्रत्येकाला दोन पसरट बाऊल, एक चमचा दिला जातो. एका बाऊलमध्ये बाऊल भरून पेबल्स ठेवले जातात. तोंडामध्ये चमचा धरून चमच्याला हात न लावता चमच्याने एका वेळी एक पेबल उचलून एका बाऊलमधून दुसर्‍या बाऊलमध्ये टाकणे.

७) सुई-दोरा:
एका मिनिटामध्ये सुईमध्ये दोरा ओवून त्यात जास्तीत जास्त पॉपकॉर्न / चुरमुरे / फुलं / बटणं ओवणे.

८) शेंगा सोलणे:
एका मिनिटात जास्तीत जास्त शेंगा सोलून जास्तीत जास्त दाणे बाऊलमध्ये जमा करणे.

(२) प्राण्याला शेपटी काढणे:
एका मोठ्या पेपरवर / कार्डबोर्डवर / फळ्यावर एखाद्या प्राण्याचे (हत्ती / झेब्रा / उंट) चित्र काढणे आणि गेममध्ये भाग घेणार्‍यांचे डोळे बांधून प्रत्येकाला वन बाय वन त्या चित्राजवळ जाऊन स्केचपेनने/ खडूने चित्रातील प्राण्याला शेपटी काढायला सांगणे. जी व्यक्ति हे काम नीट करेल ती जिंकली.

(३) सिनेमाचे/मूव्हीचे नाव ओळखणे:
दोन ग्रुप बनवणे, ग्रुप ए आणि बी. त्यापैकी ग्रुप ए मधल्या एका व्यक्तिला ग्रुप बी ने बोलवायचे आणि एका पिक्चरचे(मूव्हीचे) नाव सांगायचे. ग्रुप ए मधल्या त्या व्यक्तिने ग्रुप ए ला त्या पिक्चरचे नाव (एक अक्षरही न बोलता फक्त) अभिनय करून सांगायचा प्रयत्न करायचा. ग्रुप ए ने तो सिनेमा बरोबर ओळखला तर ग्रुप ए ला १ पॉईंट. नंतर ग्रुप बी मधल्या एका व्यक्तिला ग्रुप ए ने बोलवायचे आणि वर सांगितला तसाच गेम चालू ठेवायचा

(४) गाण्यांच्या भेंड्या:
गाण्याचे शेवटचे अक्षर पकडून किंवा गाण्यातला शब्द पकडून गाण्याच्या भेंड्या खेळणे.

Advertisements

मॅप रिडिंग…

ही गोष्ट आहे मी लंडनमध्ये होते तेव्हाची. ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी ६ च्या दरम्यान धावत पळत स्टेशनवर आले आणि नेहमीच्या ट्रेनमध्ये बसले. त्या दिवशी बहुधा शुक्रवार असावा. कारण ट्रेन बरीच रिकामी वाटत होती. ट्रेनमध्ये जास्त गर्दी नव्हती. मी एका रिकाम्या सीटवर स्थानापन्न झाले.

त्यानंतर १०-१५ मिनिटांनी एक ६०-६५ वयाचा ब्रिटिश माणूस हातामध्ये कसलासा भलामोठा मॅप घेऊन माझ्याजवळ आला. चांगलाच फुल झालेला दिसत होता 😉 पण सभ्यपणे बोलत होता. मला त्याने एका ठिकाणाचं काहीतरी नावं सांगितलं (नेमकं काय नावं सांगितलं ते आता आठवत नाही) आणि म्हणाला की ‘मला ते ठिकाण या मॅप मध्ये शोधून देशील का?’. असं म्हणून त्याने तो मोठाला मॅप माझ्याकडे दिला. आधीच मॅप्सच आणि माझं वाकडं आहे. त्यात लंडनमध्ये येऊन तेव्हा ४-५ महिनेच झाले होते त्यामुळे  मला फार फार तर घर ते ऑफिस आणि आसपासची काही स्टेशन्स एवढीच काय ती माहिती होती. तरीही लगेच ‘नाही’ कशाला म्हणा, बघू तरी सापडतं आहे का ते ठिकाणं त्या मॅपवर असं (मनात) म्हणून मी तो नकाशा चाळू लागले पण ३-४ मिनिटे झाली तरी मला काही ते ठिकाण सापडलं नाही, हे पाहून त्या माणसाने काहीसं वैतागून माझ्याकडून मॅप परत घेतला आणि मला म्हणाला, “Girls can never read a map..”

मला आधी खूप राग आला त्या माणसाचा. इथे मी त्याला मदत करायचा प्रयत्न करत होते आणि हा माझ्यावरच का वैतागतोय. पण नंतर हसू आलं कारण मला खरचं मॅपवरून एखादं ठिकाणं शोधणं अवघडं जातं 🙂

यावरूनच मॅप रिडिंगचा अजून एक किस्सा आठवतो आहे तो लंडनचाच. मी ऑफिस जॉइन केलं त्यानंतर १-२ दिवस ट्रेनने एका कलिगबरोबर ऑफिसला जात होते. त्यानंतर माझं मलाच जायचं होतं. तसं तिसरे दिवशी मी एकटीच ऑफिसला जाणार होते. ऑफिसजवळच्या ट्रेन स्टेशनवर उतरल्यावर तिथून ऑफिसपर्यंत चालत जायचा १० मिनिटांचा रस्ता आहे. तो बर्‍याच छोट्या गल्लीबोळातून जात होता. दोन दिवस त्या रस्त्याने सहकार्‍याबरोबर गेल्याने ‘सोपा रस्ता आहे’ असं वाटतं होतं आणि बराचं लक्षात ठेवायचा प्रयत्न केला होता. सो तिसर्‍या दिवशी एकदम आत्मविश्वासाने इच्छित ट्रेन स्टेशनवर उतरून तिथून चालत निघाले. निम्मी वाटं परफेक्ट लक्षात ठेवली होती पण आता दोन दिशेला जाणारे रस्ते लागले आणि इथे घोडं अडलं, डावीकडे वळायचे का उजवीकडे? मोठा प्रश्न पडला. आता काय करावं. मग सॅकमधला मॅप बाहेर काढला आणि तो काढून थोडं अंतर (उगाचच ;-)) इकडे-तिकडे जाऊन आले. पण मॅपवरून ऑफिस गाठणे काही जमलं नाही.

रस्त्यावर माणसांचा आणि वहानांचा गजबजाट होता. मग म्हंटलं इंडियन GPS सिस्टिम वापरू 😉 रस्त्यावरच्या १-२ जणांना हवा असलेला पत्ता सांगितला. आणि त्यातून कन्फ्युजन अजून वाढले. कारण एकाने डावीकडे आणि एकाने उजवीकडे जा असं सांगितले 🙂 सो इंडियन GPS सिस्टिमचे रिजल्टही इंडियन स्टाइअलनेच मिळाले 😉 असो. आता मात्र उशीर होत होता. मग सरळ तिथल्याच एरियात काम करणार्‍या मित्राला फोन लावला आणि माझं लोकेशन सांगून तिथे ये आणि मला माझ्या ऑफिसला कसं जायचं ते सांग असं सांगितलं. मग तो दोनच मिनिटात पोचला आणि त्याने मला रस्ता नीट सांगितला. खरं तर मी ऑफिसपासून दोनच मिनिटांच्या अंतरावर होते पण गल्ली-बोळ विसरल्याने रस्ता आठवतं नव्हता. आणि थोड्या दिवसांनी तो एरिया माहिती झाल्यावर हेही लक्षात आलं की मी जिथं उभी होते, तिथून डावीकडून आणि उजवीकडून दोन्ही बाजूंनी ऑफिसला जायला रस्ता आहे 🙂

नसतेस घरी तू जेव्हा… (विनोदी)

नसतेस घरी तू जेव्हा…     ( विनोदी विडंबन )
कवी – केशवसुमार

नसतेस घरी तू जेव्हा
जीव हलका हलका होतो
पीण्याला जमती सारे
अन्‌ एकच गलका होतो

नभ फाटून वीज पडावी
जल्लोश तसा मी करतो
ही शुद्ध जरा क्षीण होते
अन्‌ पती बोलका होतो

येताच विड्या ओठांशी
मी दचकून बघतो मागे
खिडकीशी थांबून ओढा
मग गंध तयांचा जातो

तव घरात अवतरण्याच्या
मज स्मरती घातकवेळा
घर भरभर अवरून सगळे
मी पुन्हा सात्त्विक होतो

तू सांग सख्या मज काय
तू केले मी नसताना ?
माझा मग जीव उगाच
भात्यासम धडधड करतो

ना अजून झालो चालू
ना हुशार अजुनी झालो
तुज पाहून मी डगमगतो
अन् चरणा वर तव पडतो !

——————————————————————————————————

टीप – कवीच्या पूर्वपरवानगीने ही कविता या ब्लॉगवर पोस्ट केली आहे.

चतुराई

एकदा लंडनच्या एका पार्कमध्ये फिरायला गेले असता तिथे एक माणूस हातात शेंगांचा पुडा घेऊन एका बाकावर बसलेला दिसला. तो खारींना शेंगा देत होता. तिथे खूप खारूताया होत्या. त्या तुरुतुरु पळत येऊन टूणकन उडी मारून त्याच्याजवळ जाऊन त्याच्याकडली शेंग घेऊन पळून जायच्या आणि दूर जाऊन दोन पायावर उभं राहून शेंगा फस्त करायच्या. खूप खारी असल्याने त्यांच्यात शेंगांसाठी थोडी स्पर्धा चालू होती.

त्यातच एक चतूर खारूताईही पाहिली. ती शेंग घेऊन थोड्या अंतरावर जाई आणि तिथल्या पालापाचोळ्यामध्ये शेंग लपवून परत त्या माणसाकडे जाई दुसरी शेंग आणायला Smile इवल्याशा प्राण्याची किती हुशारी ना. पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. या घडामोडींवर दुरून एक पारवा लक्ष ठेवून होता. ती खार दुसरी शेंग आणायला गेल्यावर हा पठ्ठा दोन पायांवर नाचत नाचत तिथे आला आणि ती शेंग शोधून चोचीत घेऊन पसार. शेरास सव्वाशेर मिळाला Smile

माझे केकचे प्रयोग

माझे केकचे प्रयोग

महिन्या-दिडमहिन्यापूर्विची गोष्ट आहे ही. लेकीचा दुसरा वाढदिवस २-३ दिवसांवर आला होता. सगळी तयारी जवळजवळ झाली होती. वाढदिवस विकडे ला होता. आणि बर्थडे पार्टी विकेन्डला ठेवली होती. त्यामुळे विकडेला मोठं सेलेब्रेशन करायचं नसलं तरी तिला नविन ड्रेस घालणं, औक्षण करणं, जवळच्या २-३ बच्चे कंपनीला बोलावून केक कापणं असं करण्याचा प्लॅन होता. मनात असं खूप होतं की तिच्या वाढदिवसाला निदान छोट्या सेलेब्रेशनला केक आपणचं करायचा.
पण इथं केक येतोय कुणाला. मग म्हटलं मॉलमधून केक मिक्स घेउन येऊ आणि करून टाकू केक. हा.का.ना.का. त्याप्रमाणं केक मिक्सचं पॅकेट आणलं. घरी आल्यावर त्यावरची केक रेसिपी वाचली तर त्यात एग घाला असं लिहिलं होतं 😦  आता मूळात केकचं करायला येत नाही म्हंटल्यावर त्या केक मिक्सचा एग न घालता कसा केक बनवायचा, हे कसं जमावं. एग ऐवजी काय घालायचं कुणाला माहितं.
आता काय करावं बरं?
मग गुगलबाबाला पाचारणं केलं, म्हटलं, एगलेस केक शोधं बरं जरा. एक एगलेस रेसिपी ट्राय केली. मस्त झाला केक. मग थोडा उत्साह आणि कॉन्फिडन्स दोन्ही वाढला.
मग नेटावर नेटाने बरीच शोधाशोध सुरू केली एगलेस केक रेसिपीची. मला जनरली रेसिपी विडिओ आवडतात कारण एन्ड रिझल्ट लगेच पहायला मिळतो म्हणून 🙂  तशी १ छान रेसिपी मिळाली. लगोलग लिस्ट करून सर्व साहित्य आणण्यात आले आणि बर्थ-डे च्या दिवशी दुपारी केक करायला सुरूवात केली. रेसिपीची एक आणि एक स्टेप जशीच्या तशी फॉलो करण्यात आली. तरी मनात सारखं येत होतं, हे आपलं केक बॅटर काहीतरी वेगळंच दिसतयं :-/ आणि त्या केकवालीचं किती छान टेक्सचर आलयं केक बॅटरचं. का बरं असं दिसतयं हे, आपला पहिला केक तर छान झाला होता, त्याचं बॅटर असंच दिसत होतं ना त्या केकवालीसारखं. मग काय झालं आहे या वेळेला :-० कुणास ठाउक? मग म्हंटलं काही प्रमाण चुकलं असेल का. मग मनानीचं थोडे पदार्थ कमी जास्त घालून थोडी डागडुजी करण्याचा प्रयत्न झाला. मग म्हंटलं ठीक आहे. चला. ओव्हन्मध्ये ठेवू आता. केक तयार होऊन बाहेर येउन कुलिंग रॅक वर स्थानापन्न झाला. माझं परत कंपॅरिझन सुरू झालं तिचा केक, माझा केक. केक तसा छान झाला होता. चव पण वाइट नव्हती. पण माझा जरा जास्त कृष्णवर्णिय वाटतं होता. पण म्हंटलं होतं असं कधी कधी आपला या रेसिपीचा पहिलाचं प्रयोग आहे. मेंदीचा कोन करून त्यात बटर आयसिंग घालून केकवर नक्षी काढून झाली 🙂
केक गोंडस दिसत होता. हा असा,

संध्याकाळी बच्चे कंपनी आली. बर्थडे गर्लच आणि बाकी मुलांचही औक्षण झालं. केक कापला. मुलांनी आणि त्यांच्या आयांनी (माझ्या मैत्रिणींनी) केक खाल्ला.  मैत्रिणींनीही ‘चांगला झाला आहे बरं का केक’ असं म्हंटलं. (केक घरी केलाय हे सांगितल्यावर असं म्हणावचं लागत नां 🙂 ) आणि मुलांनी पण मागून मागून केक खाल्ला.
माझा उत्साह आणखी वाढला. आणि मनात आलं की विकेन्ड पार्टीला पण आपणच केक बनवायचा का. आता पार्टीला २/३ दिवस उरले होते. मी ठरवलं की मागचा केक काही फार ग्रेट झाला नाहीये. आता एखादी नवीन रेसिपी ट्राय करू. मग अजून एक रेसिपी शोधून काढली. आणि म्हंटलं आज ही करून पाहू. मग सामानाची जमवाजमव सुरू केली. रेसिपी करायच्या आधी मी टेबलवर/काउंटरवर सगळे घटक (इन्ग्रेडिअंट हो) काढून ठेवते. तेव्हा मैदा काढताना म्हंटलं परवाच केक केला आहे. सो मैद्याचे पॅक बाहेरच आहे. त्यातून मैदा काढताना सहज लक्ष गेलं माझं मैद्याच्या पॅककडं आणि युरेका युरेका… मला हसावं की रडावं कळेना. मग मी हसत सुटले आणि नवर्‍याला लगेच फोन करून ही गोष्ट सांगितली. तोही हसायला लागला. त्या पॅकवर ‘Rice Flour’ असं लिहिलं होतं 🙂 इन शॉर्ट मी मागच्या वेळेस तांदळाचा बर्थडे केक केला होता 😀 म्हणूनचं ते टेक्सचर वेगळं वगैरे वाटतं होत. आणि मी उगाच त्या केकावलीला आय मीन केकवालीला (मनातल्या मनात) नावं ठेवत होते. मग मनातल्या मनातचं  केकवालीला (आणि तांदळाचा केक खाल्लेल्या माझ्या मैत्रिणींना, बच्चेकंपनीला) सॉरी म्हणून घेतलं.
आता नव्या उमेदिने कामाला लागले आणि हाती घेतलेली रेसिपी पूर्ण केली. बेसिक चॉकलेट केक तयार झाला. हा असा,

यावेळी केक छान जमून आला. नवर्‍यालाही आवडला. आणि मनात ठरवलं की बस्स! विकेन्ड पार्टीला आपणचं केक बनवायचा! पण आता नेक्स स्टेप.. आता माझा आवडता एगलेस ब्लॅक फॉरेस्ट केक बनवायचा. मॉन्जिनीजची खूप आठवण आली. मॉन्जिनीजला मिस करत होते ना 😦 मग परत नेटवर शोधाशोध सुरू झाली. एगलेस ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री. पण ही पेस्ट्री काही मिळेना. पेस्ट्री म्हंटलं की स्नॅकचेच काहीबाही आयटम पेश व्हायला लागले :-/ मॉन्जिनीज केक/पेस्ट्री असं शोधून पण काही मिळेना. मग शेवटी ‘एगलेस ब्लॅक फॉरेस्ट केक’ चा शोध सुरू झाला. या विषयावर जोरदार R&D सुरू झाले. आणि बरीचं चांगली माहिती मिळत गेली.
नवर्‍याला काही अस्मादिक बर्थडे केक करणार असल्याचा बेत सांगितला नाही. कारण तो लगेच म्हणाला असता की नको नको तू काही करत नको बसू. आपण विकतच आणू केक. आपल्याला अजून पार्टीची तयारी करायची आहे वगैरे वगैरे. म्हणून मग ब्लॅकने (छुप्या पद्धतीने) ब्लॅक फॉरेस्टचे सर्व सामान घरी आणून ठेवले. आणि मग बर्थडेच्या दिवशी सकाळी प्लॅन जाहीर केला की मी (तुझ्या मदतीने – हे सायलेंट असतं ;-)) घरीचं केक करणार आहे. चांगला झाला तर संध्याकाळी हा केक कट करू. नाही झाला तर मग नवीन आणू.
मग खूप मेहेनत घेऊन, अहोंची (केक मिश्रण फेटायला) मदत घेऊन, त्याबदल्यात त्याला थोडे थोडे आयसिंग करायला देऊन 😉 एकदाचा केक सुफळ संपूर्ण झाला. आणि खरचं आमची मेहेनत फळाला आली आणि मस्त केक तयार झाला.
बा अदब, बा मुलाहिजा, होशिय्यार…… एगलेस ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री (बरीचशी माँजिनीज सारखी) येत आहे…

आणि हा फ्रीज मध्ये ठेवलेला केक मीच लहान होऊन सारखा सारखा फ्रीज उघडून पहात होते 🙂 आणि जेव्हा आमच्या छोट्या परीला हा केक दाखवला तेव्हा तर तिचा आनंद गगनात मावेना. ती नुसती तेतू, तेतू (केकू उर्फ केक) करून नाचायला लागली. तिची खुललेली कळी, फुललेला चेहेरा आणि तिच्या चेहेर्‍यावरून ओसंडून चाललेला आनंद बघून केकपायी केलेल्या सर्व कष्टाच सार्थक झाल्यासारखं वाटलं 🙂 आणि वाटलं की… ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ 🙂

तर असे होते माझे केकचे प्रयोग…
… (की माझी केक गाथा की केक कथा का केक पुराण ;-))  …. जे काहि असेल ते असो.

तर अशी ही साठा उत्तराची केक कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

टीपः  या वर दिलेल्या केकचा..
मेकिंग ऑफ ‘एगलेस ब्लॅक फॉरेस्ट केक’
हा एपिसोड पा.कृ. मध्ये लवकरच पोस्ट करीन 🙂

दिवाळीचे लायटिंग

दिवाळी अगदी तोंडावर आली होती. आणि दिवाळीची बरीच तयारी करून झाली होती. फराळाचे पदार्थ करून झाले होते. रांगोळ्या, पणत्या, मेणबत्त्या आणून झाल्या होत्या. आणि गेल्या वर्षीचा आकाशकंदिल ही सापडला होता.
मग लक्षात आले की अरे लायटिंगसाठी थोडी जास्त लांब वायर लागणार आहे. मग ती वायर आणण्यासाठी अस्मादिकांचे एका हार्डवेअरच्या दुकानात जाणे झाले. एक तर जनरली हार्डवेअरच्या दुकानात सहसा मुली कमी जात असल्याने कदाचित, आधीच दुकानदाराच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होते. मग त्याला कोणती वायर हवी, किती लांबीची वगैरे सांगितले. त्याने मला तशी एक वायर काढून दिली.
आता यानंतर मी ती वायर घ्यावी, पैसे द्यावे आणि कल्टी व्हावे अशी त्याची अपेक्षा. पण त्याच वेळी मला दुकानातली त्या वायरच्या टाइपमधली इतर रंगीत भेंडोळी दिसली आणि मी त्याला नेहमीच्या शॉपिंगच्या सवयीने विचारले,”यात काही आणखी काही कलर कॉम्बिनेशन मिळेल का.” 🙂 यावर त्याला काय बोलावे कळेना.
त्याच्या दुकानदारी आयुष्यात त्याला असा प्रश्न पहिल्यांदाच कोणीतरी विचारला असेल. त्याच्या चेहर्‍यावरील असे अगतिक 😉 भाव पाहून मग मात्र मी त्याला पैसे देउन घरी आले 😀

सेक्युरीटी चेक

आयुष्यात अनेक गमती जमती घडत असतात. असाच एक मजेशीर प्रसंग.

      २/३ वर्षापूर्वीची गोष्ट. वेळ आहे सकाळी ८ वाजताची. स्थळ आहे एका नामांकित आय. टी. कंपनीचे प्रवेशद्वार. बसमधून खाली उतरून सेक्युरिटीसमोरील  मुलींच्या रांगेत मी उभी होते. रोज सेक्युरीटीकडून बॅग चेक केली जाते, तशी आजही केली जात होती. आणि लाइन भरभर पुढे सरकत होती.
      माझा नंबर आला. नेहमीप्रमाणे मी माझी खांद्याला अडकवलेली पर्स उघडली. आणि लेडी सेक्युरिटी गार्ड  समोर धरली. तिने मग माझ्याकडे (आश्चर्याने?/संशयाने?) पाहिले आणि ती मला म्हणाली, “तुम्ही शेवया विकता का?” 😉  :-O मला क्षणभरं खूप राग आला आणि नंतर खूप हसू आलं.                                                                                                                                                                     त्याचं झालं असं होतं की माझ्या घराजवळ एके ठिकाणी हाताने बनवलेल्या शेवया छान मिळतात. त्याच एक लहान पॅक मी माझ्या एका संसारी मैत्रिणीसाठी आणलं होतं आणि ते नेमकं ट्रान्स्पारंट कव्हरमध्ये होतं.
That was one of the embarrassing moments of my life 🙂