स्वतःच स्वत:ला घडवणं

स्वतःच स्वत:ला घडवणं… अवघड काम आहे.

स्वतःच स्वतःला घडवणं म्हणजे स्वतःला एक better person बनवणं. मग जसं दगडातून मूर्ती घडवताना, त्याला सुबक आकार देण्यासाठी ठाकून ठोकून त्याचा अनावश्यक भाग काढून टाकावा लागतो, त्याचप्रमाणं स्वतःमधले दुर्गुण, आळस, वाईट सवयी प्रयत्नपूर्वक दूर कराव्या लागतात. दुर्गुण दूर करण्यासाठी आधी ते शोधावे लागतात, हे दुर्गुण आपल्याकडे आहेत हे स्वतःशी मान्य करावं लागतं. मग ते दूर करण्याचा प्रयत्न करता येतो. आणि हे जाणीवपूर्वक करणं किंवा जाणतेपणी स्वतःला घडवणं जास्त अवघडं असतं.

Advertisements

मातृदिनाच्या निमित्ताने …. आधुनिक प्रतिज्ञा..

नुकताच मातृदिन साजरा झाला. त्या निमित्ताने मनात आलेली एक कल्पना.

मातृदिन. मातृत्वाचा गौरव. आईपणाचं सेलिब्रेशन. हीच आईपणाची संकल्पना अजून विस्तृत करून आपल्या अजून एका आईसाठी आपण काय करतो, काय करू शकतो आणि काय करूया याबद्दलही बोलता येईल. ही आई म्हणजे एक तर भारतमाता आणि तिची आई म्हणजे धरणीमाता. या दोहोंसाठी काय काय करतो/करता येईल. यामध्ये आपल्याला सुचणार्‍या आणि अंमलात आणणण्यासारख्या लहान-मोठ्या गोष्टींची एक यादी आपल्याला करता येईल.

अशा छोट्या छोट्या गोष्टी/उपक्रम जसं की
– मी सगळे सिग्नल पाळते/पाळतो/पाळेन.
– जिथे शक्य आहे तिथे रांग / क्यू बनवेन, रांगेत उभी राहिन.
– सार्वजनिक स्वच्छता पाळीन. कचरा करणार नाही.
– जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा तिथे तिथे चालत जाईन, सायकलने जाईन, पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरेन
– पाणी आणि वीज जपून वापरेन.
– शक्य तितका प्लास्टिकचा कमी वापर करेन आणि प्लास्टिकचा जास्तीत जास्त पुनर्वापर (रियूज) करेन.
– जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे झाडं लावेन, झाडं जगवेन.
– भाजी/सामान आणायला जाताना कापडी पिशवी वापरेन.
वगैरे वगैरे..

चला तर मग तुम्हालाही अशा काही छान गोष्टी/उपक्रम सूचले तर नक्की लिहा.
ही यादी म्हणजे एक वचन असेल आपणच आपल्याला दिलेले किंवा तो असेल संकल्प मातृदिनाचा.

या सगळ्या गोष्टी एकत्र लिहिल्या तर खरचं नवीन आधुनिक ‘प्रतिज्ञा’ होईल, जशी आपण लहानपणी शाळेत म्हणायचो तशी. ही प्रतिज्ञा लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सहज समजण्यासारखी आणि सहज अंमलात आणण्यासारखी आहे.  खरचं आज ही आधुनिक प्रतिज्ञा रोजच्या आयुष्यात प्रत्येकाने पाळायचा प्रयत्न केला तर (भू आणि भारत) या मातांना ती खरी मातृदिनाची भेट असेल, नाही का.

ब्लॉगवर काय लिहावे?

  • ब्लॉगवर काय लिहावे?

ब्लॉगवर मनातलं अगदी काहीही लिहावं. माहिती असलेलं काहीही…, शेअर करावं असं वाटणारं काहीही…, असं काहीही लिहावं.

  • (विशेषतः मराठी) ब्लॉगवर का लिहावं?

आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल काहीही माहिती हवी असेल (मग ती कोणत्याही विषयाबद्दल असो) तर ती मिळवण्याचा सगळ्यात सोपा उपाय काय बरं. (उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे.) तरं हे उत्तर आहे गुगल करणे. ‘गुगल करणे’ हा आजकाल एक नवीन वाक्यप्रचार झाला आहे.

पण खरं पहाता ‘गुगल’ हे एक सर्च इंजिन आहे. गुगल केल्यावर लगेच हवी ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम गुगल करतं. पण आपल्याला हवी ती माहिती कशी मिळते, ती गुगलकडे कुठून आली तर याचं उत्तर आहे की ती माहिती आधी कोणीतरी डॉक्युमेंट केली आहे. (लिहून ठेवली आहे/संकलित केली आहे). म्हणजेच ज्याने कोणी हे काम केले आहे त्याचा उपयोग आपल्याला झाला. गुगलने फक्त मध्यस्थाची भूमिका चोख बजावली.

ही सगळी प्रोसेस (प्रक्रिया), याचा ‘ब्लॉगवर काय लिहावे?’ या प्रश्नाशी घनिष्ट संबंध आहे. विशेषतः या लेखात/पोस्टमध्ये मला ‘मराठी ब्लॉगवर काय लिहावे?’ याबद्दल लिहायचं आहे.

मला असं वाटतं की ज्याबद्दल आपल्याला ज्ञान आहे,  जे जे आपल्याला माहिती आहे, मग भले ती गोष्ट क्षुल्लक का असेना, ते पोस्ट छोटे का असेना, ते ब्लॉगवर लिहावे. आपले अनुभव, आपल्याला येत असलेल्या पाककृती, जीवनाने आपल्याला शिकवलेल्या चार गोष्टी … असं काहीही उपयुक्त. ज्याचा दुसर्‍याला फायदा होइल, उपयोग होइल असे काहीही.

त्यामुळे काय होईल की मराठी शब्द सर्चला दिल्यावर त्यासंबंधीची (ही) उपयुक्त माहिती/ज्ञान मराठीतून उपलब्ध होईल आणि हे किती छान होईल. कोणत्याही सर्च इंजिनला कोणताही इंग्लिश भाषेमधला शब्द सर्च करायला द्या. ढीगभर रिझल्ट मिळतील. म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दलची अमाप माहिती इंग्लिश भाषेत उपलब्ध आहे. हेच मराठीच्या बाबतीत त्या मानाने कमी माहिती उपलब्ध आहे.

या आंतरजालावरची (इंटरनेटवरची) मराठी भाषेतली लेखनसंपदा वाढवण्यात आपण आपल्या परीने हातभार लावू शकतो असं मला वाटतं.

म्हणजे ब्लॉगवर आपल्या कविता, लेख, चारोळ्या वगैरे वगैरे पण अवश्य लिहावे. पण बरेचदा आपल्याकडे सांगण्यासारख्या छोट्या-मोठ्या गोष्टीही असतात. त्याबद्दल ‘ह्यात काय लिहिण्यासारखे आहे’, ‘ही तर छोटी गोष्ट आहे. त्यात काय विशेष’ असं न वाटून घेता कोणत्याही बाबतीतले आपले ज्ञान इतरांबरोबर शेअर केले तर खूप छान होईल. आणि इंटरनेटवर मराठी भाषेतल्या साहित्यसंपदेत / माहितीच्या खजिन्यात आपल्याकडून खारीच्या वाट्याइतकी भर तर नक्कीच पडेल 🙂