नसतेस घरी तू जेव्हा… (विनोदी)

नसतेस घरी तू जेव्हा…     ( विनोदी विडंबन )
कवी – केशवसुमार

नसतेस घरी तू जेव्हा
जीव हलका हलका होतो
पीण्याला जमती सारे
अन्‌ एकच गलका होतो

नभ फाटून वीज पडावी
जल्लोश तसा मी करतो
ही शुद्ध जरा क्षीण होते
अन्‌ पती बोलका होतो

येताच विड्या ओठांशी
मी दचकून बघतो मागे
खिडकीशी थांबून ओढा
मग गंध तयांचा जातो

तव घरात अवतरण्याच्या
मज स्मरती घातकवेळा
घर भरभर अवरून सगळे
मी पुन्हा सात्त्विक होतो

तू सांग सख्या मज काय
तू केले मी नसताना ?
माझा मग जीव उगाच
भात्यासम धडधड करतो

ना अजून झालो चालू
ना हुशार अजुनी झालो
तुज पाहून मी डगमगतो
अन् चरणा वर तव पडतो !

——————————————————————————————————

टीप – कवीच्या पूर्वपरवानगीने ही कविता या ब्लॉगवर पोस्ट केली आहे.

Advertisements

पुन्हा घेतली मी भरारी वगैरे …

पुन्हा घेतली मी भरारी वगैरे…                                                                                                             कवी – वैभव जोशी

पुन्हा घेतली मी भरारी वगैरे;
पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे.

खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही;
तुझा मात्र चेहरा विचारी वगैरे.

बिचारा खरोखर भिकारी निघाला;
मला वाटले असेल पुढारी वगैरे.

म्हणा तूच किंमत करावी माझी;
तुला शोभते अशी सावकारी वगैरे.

कशाचीच आता नशा येत नाही;
तसा घाव होतो जिव्हारी वगैरे.

तिथे एकटा तोच होता दरिद्री;
रुबाबात होते सारे पुजारी वगैरे.

आता फक्त भेटी होतील मनांच्या;
मळभ दाटलेल्या अशा दुपारी वगैरे.

किती जीवना रोज देतोस धमक्या;
दिली का यमाने तुला सुपारी वगैरे.

असे ऐकले शेवटी न्याय होतो;
पुढे काय झाले निठारी वगैरे…

 

या सुंदर कवितेचं तितकचं अप्रतिम काव्यवाचन सचिन खेडेकर यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये केलं आहे. ते नक्की पहा.