पब्लिक लायब्ररी

राले मध्ये रहात असताना घराजवळच एक पब्लिक लायब्ररी होती. या पब्लिक लायब्ररीज खूप छान असतात. ही लायब्ररी खूप प्रशस्त, हवेशीर होती. लायब्ररीचे पार्किंगही मोठे होते. या लायब्ररी मध्ये भरपूर पुस्तके वेगवेगळ्या विभागांमध्ये विषयवार लावून ठेवलेली होती. लायब्ररीमध्ये प्रवेश घेणे खूपच सोपे असते. ५ मिनिटांमध्ये काम होते. पब्लिक लायब्ररीची सुविधा विनामूल्य असते. फक्त पुस्तके परत करण्यास उशीर झाल्यास दंड तेवढा असतो. एका कार्डवर एका वेळी हवी तेवढी पुस्तकं घेता येतात. लायब्ररीबाहेर एक ड्रॉपबॉक्स असतो. फक्त पुस्तकं रिटर्न करायचं काम असेल तेव्हा या ड्रॉपबॉक्समध्ये पुस्तकं टाकून परस्पर जाता येतं. ही पुस्तकं ठराविक वेळेला लायब्ररीचे कर्मचारी आत घेऊन जातात. लायब्ररी बंद असेल तेव्हाही रिटर्न करायची पुस्तकं या ड्रॉपबॉक्स टाकून जाता येते. पुस्तकं परत करण्यास जमणार नसेल तेव्हा ती ऑनलाइन रिन्यू करता येतात. एक पुस्तक जवळ जवळ ८-१० वेळा रिन्यू करता येते. त्यामुळे तुम्हाला दंड होऊ नये यासाठी भरपूर सोय केली असते. एवढं करून जर वेळेत पुस्तक रिन्यू किंवा रिटर्न केले गेले नाही तर मात्र प्रत्येक पुस्तकामागे प्रत्येक दिवसामागे दंड आकारला जातो.

या लायब्ररीमध्ये एक छोटेखानी कॉम्प्युटर विभाग होता. त्यामध्ये ईंटरनेट कनेक्शन असलेले १५-२० कॉम्प्युटर होते. ते कोणालाही विनामूल्य वापरता यायचे. आपल्या लॉग इन आयडी ने लॉग इन करावे लागायचे. एकदा लॉग -इन केल्यावर ३० मिनिटाचं सेशन वापरायला मिळायचं. प्रिंट आउट्सना मात्र चार्ज असायचा. लहान-मोठे कोणालाही कॉम्प्युटर्स वापरण्याची परवानगी होती. याशिवाय लायब्ररीमध्ये पुस्तकं सेल्फ चेक आउट करायची सोय होती. लायब्ररीचे कर्मचारी कोणत्याही मदतीसाठी किंवा कोणतीही माहिती देण्यास नेहमी तत्पर असायचे.

लहान मुलांच्या विभागात छोट्या छोट्या टेबल खुर्च्यांचे सेट्स होते. लहान मुलांना त्यावर सहज बसता यावे, आरामात वाचता यावे अशा तर्‍हेची व्यवस्था होती. अगदी छोट्यांसाठी वुडन खेळणी, गेम्स ठेवलेले असायचे. तिथे जवळचं लायब्ररीच्या आतच एक मोठी रूम/हॉल होता. तो छान सजवलेला असायचा. सजावट सिझननुसार वेगवेगळी केली असायची. दर आठवड्यातून एकदा वेगवेगळ्या एजग्रूपमधल्या मुलांसाठी वेगवेगळ्या वेळी या हॉलमध्ये स्टोरी टाइम असायचा. म्हणजे इथे मुलांसाठी एक छोटं पुस्तक वाचून दाखवलं जाई, कधी पपेट शो पण असे. तर कधी गाणं लावून त्यावर सोपा डान्स करून घेतला जाई. इथं मुलांना सोडून पालकांनी लायब्ररीमध्ये वेळ घालवला तरी चाले. ज्यांची मुलं लहान आहेत ते पालकं मुलांसोबत स्टोरीटाइमला बसायचे. मुलं खूप एन्जॉय करायची हा स्टोरीटाइम. विकेंडला फॅमिली स्टोरी टाइमही असायचा. त्याला जाण्याचा योग मात्र कधी आला नाही.

याशिवाय लायब्ररीच्या एका सेक्शनमध्ये टेबल- खुर्च्या होत्या, एका सेक्शनमध्ये पॉवर पॉइंट असलेले डेस्क होते जेथे बसून आपला लॅपटॉप घेऊन अभ्यास करता यायचा किंवा पुस्तकं वाचत बसता यायचे. लायब्ररीच्या एका टोकाला एक आयताकृती हॉल होता त्याला काचेची भिंत आणि काचेचं दार होतं. इथे सुद्धा अभ्यास करण्यासाठी, पुस्तकं वाचण्यासाठी व्यवस्था होती. इथेही मोबाइल/आयपॅड/लॅपटॉप चार्जिंग करण्याची सोय होती. एकूणच लायब्ररीत निरव शांतता असली तरी या विभागात तर एकदम पिन ड्रॉप सायलेन्स असायचा.

लायब्ररीचे काही ना काही कार्यक्रम सतत चालू असायचे. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असायचे. कधी ‘Craft It’ वर्कशॉप्स असायची. कधी करीअर ऑप्शन्सवर सेशन, कधी ‘Meet the artist’, कधी ‘Financial Management’ वर कार्यक्रम, कधी ‘Baby/Toddler/Family storytime’, कधी टीन एजर्ससाठी काही प्रोग्रॅम असे विविध प्रकारचे विविध वर्गांना समोर ठेवून, विविध एजग्रूपसाठी छान कार्यक्रम असायचे. आणि फेस्टिव सिझनमध्ये (जसं की इस्टर, हालोविन, ख्रिसमस) त्या त्या फेस्टिवलशी संबंधित कार्यक्रम असायचे.

या लायब्ररीमुळे, तिथल्या कार्यक्रमांमुळे वेळ छान जायचा. म्हणून आठवडा, दोन आठवड्यातून लायब्ररी ट्रीप नक्की असायची.

 

Advertisements

१) इस्टगेट पार्क, राले (Eastgate Park, Raleigh)

Eastgate Park, Raleigh
4200 Quail Hollow Drive
Raleigh, NC 27609

हा Raleigh मधला एक छान पार्क आहे. घनदाट झाडी हे ह्या पार्कचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या पार्कच्या परिसरात आल्या आल्या लगेचच वातावरणातला गारवा जाणवायला लागतो.

मोठ्या मोठ्या झाडांची सावली, थंडगार हवा.. मस्तच वाटायला लागते. मी जेव्हा या पार्क मध्ये गेले होते तो दिवस चांगलाच सनी होता. बाहेर ८०/८२ °F एवढे टंपरेचर होते. आणि रणरणते ऊन होते. पण पार्कमध्ये मात्र हे अजिबात जाणवत नव्हते.

छोट्यांसाठी: लहान मुलांची तर चंगळच आहे या पार्कमध्ये.  त्यांना मुलांना खेळायला स्विंग, स्लाइड्स, सी-सॉ याबरोबरच खेळण्यासाठी अजून विविध प्रकार आहेत. एक छोटं म्युझिकल युनिट आहे.  त्यावर बेल्स, घंटा, तबला/ड्रम वाजवता येतो. छोटसं इग्लू आहे मुलांना आतबाहेर करायला.

आणि महत्त्वाचं म्हणजे पार्कच्या प्ले एरियाच फ्लोरिंग खूप छान आहे. बहुधा रबर फ्लोरींग असावं. त्यामुळे लहान मुलांच्या दृष्टीने खेळायला सेफ असा पार्क आहे. ५ वर्षाखालच्या मुलांना खेळण्यासाठी वेगळा विभाग आहे आणि ५ वर्षावरच्या मुलांसाठी वेगळा विभाग. त्यामुळे छोट्या बच्चेकंपनीलाही बिनधास्त खेळता येते.

मोठ्यांसाठी: पार्कमध्ये फूटबॉलसाठी मोठे ग्राउंड, बास्केटबॉलसाठी छोटा एरिया  आणि टेनिससाठी २ कोर्ट्स आहेत. मोठ्यांना एक लाँग वॉक घेता येतो. किंवा फूटबॉल / बास्केटबॉल / टेनिस खेळता येते. पार्कमध्ये बसण्यासाठी काही बाक आहेत. पण पार्टी किंवा पॉटलक करण्याएवढी मोठी जागा नाही किंवा शेल्टर नाहीये.

एकूणच लहान मुलांना खेळायला घेऊन जायला किंवा निवांत टाइमपास करायला छान पार्क आहे.

काही महत्त्वाचे,
१) पार्कला कोणतीही एन्ट्री फी नाहिये. विनामूल्य पार्कींगची सोय आहे.
२) पार्कमधले रेस्टरूम मात्र यथातथाच आहे.
३) पार्टी/पॉटलक करण्यासाठी तेवढी मोठी जागा नाही. शेल्टर नाहीये.
४) बाहेर थोडे ऊन असले आणि वातावरणात थोडा उकाडा असला तरी अशा वेळीही जाण्यासारखे पार्क आहे. कारण आतल्या घनदाट झाडी आणि गर्द सावलीमुळे ऊन/उकाडा विशेष जाणवत नाही.
५) या साइटवर पार्कचा पत्ता, फोन नं., नकाशा, पार्क सुरू-बंद होण्याच्या वेळा इ. माहिती मिळेल.
http://www.raleighnc.gov/home/content/PRecRecreation/Articles/EastgateParkAndCenter.html

इस्टगेट पार्कचे फोटो:
१) एन्ट्रन्स

२)बसण्यासाठी सिमेंटची ३ टेबल्स.

३) टेनिस कोर्ट, बास्केट बॉल कोर्ट आणि फूटबॉल ग्राउंड

४) लहान मुलांचा प्ले एरिया (Children’s play area)

५) वॉकिंग ट्रेल