माझी उत्साहमूर्ती आजी

नीट चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी, काळ्या-चंदेरी केसांचा घातलेला सुबक अंबाडा, शांत-समाधानी चेहर्‍यावर फुललेलं स्मितहास्य. प्रसन्न व्यक्तिमत्त्व. अशी माझी आजी.

लहानपणापासून तिच्याशी गप्पा मारायला मला खूप आवडतं. ती म्हणजे चैतन्याचा खळाळता झरा. तिच्याशी बोललं की कसं छान वाटतं. मी आजवर कधी तिला कंटाळलेलं, थकलेलं पाहिलंच नाहिये. सदैव हसतमूख, उत्साही, बोलक्या स्वभावाची, आम्हा नातवंडांपेक्षाही तरूण अशी माझी आजी. सतत काही ना काही कामात व्यग्र. कित्येक वेळा तिच्या बरोबर काम करता करता आम्ही थकून जातो पण आजी मात्र अजिबात दमत नाही. म्हणून आम्ही तिला म्हातार्‍या नातवंडांची तरूण आजी म्हणतो स्मित

असंच एकदा मी तिला विचारलं, “आज्जी, तूझ्या अखंड उर्जेच रहस्य काय?” तर ती म्हणाली “जेव्हापासून आम्हाला कळतं आहे तेव्हा पासून आम्ही कामचं करत आहोत. या सतत काम करण्यामूळचं आत्ताही एनर्जी टिकून आहे.”

घरात एखादा कार्यक्रम असेल तर त्याची तयारी, मग कार्यक्रम, मग नंतरची आवरा-आवर, अशा वेळी कधी कधी खरचं असं होतं की घरातली सारी मंडळी थकून जातील, पण आजी मात्र कामं करूनही फ्रेश. आणि ती स्वतः भरपूर काम करत असली तरी सहसा दुसर्‍याला कामं सांगायची तिला फारशी सवय नाही. उलट कोणी आलं की स्वतः चहा करेल, सोबत डब्यातून खाऊ/बिस्किटं काढून डीशमध्ये देईल. हे खा, ते खा असा आग्रह करेल.

रिकाम्या वेळात ती रोजचा पेपर आवर्जून वाचते. रोजची आवडीची मालिका पहाते, त्याची स्टोरी (जणू काही त्यातली पात्रं खरीच आहेत या भावाने) आम्हाला सांगते स्मित तिची स्वतःची एक छोटी डायरी ती मेंटेन करते ज्यात तिला लागणारे फोन नंबर, पत्ते तिने सुवाच्य अक्षरात लिहिले आहेत. आता तिचं थोडं जास्त वयं झाल्यामुळे काही गोष्टी तिच्या पूर्वीइतक्या लक्षात रहात नाहीत पण अगदी परवा-परवा पर्यंत सगळ्यांचे (मुलं, मुली, सूना, जावई, नातवंड) वाढदिवस लक्षात ठेवून प्रत्येकाला आजीचं पत्र किंवा फोन नक्की असायचा. आता लक्षात येइल तेव्हा फोन करते आणि वाढदिवशी प्रत्यक्ष भेट होणार असेल तेव्हा आजही काही ना काही खाऊ/भेट आवर्जून देते.

कूटंबातल्या प्रत्येकाची तिला काळजी असते. कोणाला काही दुखलं-खूपलं, कोणाची तब्येत बरी नाहीये अशा वेळी तिचही मन काळजीत असतं. ती तिथे असेल तर मग कुठे काढा करून दे, कुठे माहिती असलेले काही घरगुती उपाय सूचव असं करत रहाते आणि ती लांब असेल तर मग फोनवरून हे उपाय सांगते. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तिच्या परीने ती त्यावर सोल्यूशन सूचवत असते. वयोमानानुसार तिलाही दू़खतं – खूपतं असेल पण आजवर मी तिच्या तोंडून तब्येतीच्या तक्रारी फारशा ऐकल्या नाहीत. किंवा कोणालाही ‘माझं डोकं चेपून द्या, बाम लावून द्या, पाय चेपून द्या’ असं स्वतःहून सांगितल्याचं मला स्मरतं नाही.

एखादे गेटटूगेदर आम्ही कधी कुठे रेस्टॉरंटमध्ये ठरवले असता छानशी साडी नीट नेसून, केसांचा नीटनेटका अंबाडा घालून, हलकीशी पावडर लावून सगळ्यांबरोबर उत्साहाने येते. स्वत:साठी इडली-दोसा असे पचायला हलके पदार्थ मागवते. पण आम्ही आग्रह केला तर आम्ही मागवलेले (तिच्यासाठी) नवीन पदार्थही टेस्ट करते, जसं की पिझ्झा, पास्ता, नूडल्स वगैरे. कुठेच नव्या पिढीबद्दल तक्रारी नाहीत, आजकालची मूलं म्हणजे… असा सूर नाही. उलट प्रत्येक पिढीशी छान जूळवून घेते, छान मिक्स होते. ओपन माइंडेड आहे माझी आजी.

रूढी-परंपरांबद्दलही आजी काही प्रमाणात आधुनिक विचारांची आहे. आजोबांचं निधन झाल्यानंतर तिनं मंगळसूत्र घालणं सोडलं पण टिकली अजूनही लावते. छान रहाते. देवावर विश्वास आहे तिचा खूप. रोज देव-पूजा, स्तोत्र म्हणणे हे सगळ करते. पण ते स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःपुरतं. कशाचही अवडंबर नाही. दुसर्‍याला कशाचीही सक्ता नाही.

या माझ्या आजीशी बोलताना कधी आपल्याला जनरेशन गॅप वगैरे काही जाणवतं नाही. खरचं. ती अगदी लहान बाळापासून ते वृद्धांपर्यंत कोणाशीही सहजतेने संवाद साधते. जे जे कोणी तिच्या संपर्कात येते त्यांना ती काही भेटींमध्येच आपलसं करते. तिने खरं तर आयुष्याच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक बर्‍या वाईट घटना पाहिल्या, अनुभवल्या असतील, पण स्वभावात किंवा बोलण्यात कुठेही कटूता नाही, वैताग नाही. याचा अर्थ तिच्या वाट्याला दू:ख कधी आलेच नाही असं मूळीच नाही. पण त्या त्या प्रसंगी खंबीर होत तिने ते प्रसंग निभावून नेले आणि नेहमी आनंदी राहिली. कारण “आयुष्यात घडणार्‍या बर्‍या, वाईट सगळ्या घटना अ‍ॅक्सेप्ट करून पुढे जाणे, प्रॉब्लेम्स आले तर ‘हे माझ्याच बाबतीत का झालं’ असा विचार करत बसण्यापेक्षा त्यावर सोल्यूशन शोधणे, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहाणे” हे तिच्या जगण्याचं साधंसोपं सूत्र आहे. भूतकाळाबद्दल विचार न करता, भविष्याची काळजी न करता, वर्तमानात आनंदी रहाणं तिनं छान साधलं आहे.

तिला नवीन गोष्टी शिकायची खूप हौस आहे म्हणजे अगदी टी.व्ही. चा रिमोट कसा वापरायचा यापासून ते मोबाईलवरून फोन कसा लावायचा, कसा रिसिव्ह करायचा इथपर्यंत अनेक गोष्टी शिकण्यात तिला रस असतो. आणि हो, तिला बोलताना इंग्लिश शब्द वापरायचीही खूप आवड आहे. आम्हा नातवंडांच्या तोंडून एखादा नवीन तिला माहिती नसलेला इंग्लिश शब्द आला की ती त्याचा अर्थ विचारते आणि बरोबर लक्षात ठेवून पुढच्या वेळी योग्य ठिकाणी आठवणीने वापरते. कोणत्याही नवीन गोष्टी आत्मसात करणं तिला आवडतं. वयाच्या ऐंशीव्या वर्षानंतर तिनं मावशीबरोबर पहिला विमानप्रवास केला, अजिबात न घाबरता. कौतूक वाटतं मला तिचं.

तिच्या काळी ती चौथीपर्यंत शिकली. त्यापुढेही तिला शिकवायचा तिच्या दादांचा आग्रह होता असं ती सांगते. “त्या लहान वयात शिक्षणाचं महत्त्व तितकं वाटलं नाही. शिकायचं म्हणजे एका जागी बसणं आलं आणि लहानपणी खेळण्याकडे खूप ओढा असतो ना, त्यामुळे नाही शिकले पुढे. पण शिकायला हवं होतं खर तरं” असं म्हणते. तिला पेटी वाजवायला आवडतं, गाणं म्हणायला आवडतं. वयाच्या ५०-५५ व्या वर्षी तिने गायनाची परीक्षा दिली आणि त्यात ती पहिली आली.

अशा माझ्या तरूण आजीला उत्तम आयूरारोग्य लाभो आणि अशी आजी सगळ्यांना मिळो हीच सदिच्छा.
तिच्याकडे पाहून मनोमनं मी हेच ठरवलं आहे की मी जेव्हा तिच्या वयाची होईन तेव्हा मी पण अगदी तिच्यासारखीच होण्याचा प्रयत्न करेन, सर्वांना हवीहवीशी वाटणारी हसतमूख आज्जी स्मित

Advertisements

एक इवलसं रोपटं…

एक छोटसं, इवलसं, छान, तरतरीत, हिरवंगार रोपटं. नुकतच लावलेलं.

त्याला जर वेळच्या वेळी चांगल खतं-पाणी घातलं, चांगली निगा राखली, वेळोवेळी तण काढले, अशी त्याची काळजी घेतली तर ते पण आपल्याला भरभरून देतं. हां, हे करायला कष्ट जरूर पडतात. पेशन्स लागतो, सातत्य लागतं. पण हे सगळं आवश्यकच असतं नाही का. इवलसं आहे ते. त्याची काळजी आपणच तर घेतली पाहिजे ना. आणि हे श्रम मुळीच वाया जात नाहीतं.

त्या रोपट्याची हळूहळू निकोप वाढ होते. ते मस्त बहरतं, छान खुलतं, खूप खूप फुलतं. आपणही मग त्याच्याकडे पाहून खूश होतो, आपल्याला समाधान वाटतं.

तरीही त्याची काळजी घेत रहावीच लागते पण आता ती काळजी घेणं आपोआप अंगवळणी पडतं, त्यात आनंद वाटतो आणि त्याचं करायला पूर्वीइतके श्रमदेखील पडत नाहितं कारण तेही चांगलं पाय रोवून उभं राहिलं असतं. आणि आता तेच आपल्याला सावली देऊ लागलेलं असतं.

कोणत्याही नव्याने जोडलेल्या नात्याचंसुद्धा असचं असतं नाही का.
त्याची दोन्ही बाजूंकडून चांगली जोपासणी केली गेली तर ते का नाही बहरणार.

कौतुक

कौतुक … एकदम जादूई शब्द आहे ना. आणि त्याचा इफेक्ट पण जादूच्या कांडीसारखाच. सगळ्यांनाच आवडतं कौतुक. अगदी लहान मूलापासून ते आजी-आजोबांपर्यंत.. खरचं कोणी प्रशंसेचे दोन शब्द बोलले की कसं छान वाटतं ना, अंगावरून मोरपिस फिरल्यासारख.
आणि कौतुक कशाचंही केलं जाऊ शकतं अगदी लहान सहान गोष्टींचंही. ते करण्यासाठीही फार काही मह्त्कष्ट पडतात असंही नाही. दोन चांगले शब्द बोलायला काहीच त्रास नसतो.

मनुष्य स्वभावाचीही किती गंमत आहे ना. त्याला आपलं कौतूक केलेलं खूप खूप आवडतं, पण तेवढीच नावड असते दुसर्‍याच कौतूक करण्याची 🙂 काहींना नावडं असते तर काहींच्या गावीही नसतं की आवर्जून कुणाचं कौतूक करायला हवं.
पण एकदा ही जादूची कांडी फिरवून तर पहा ना. खरचं जादू होते 🙂 तुम्हाला लगेच जाणवणार नाही कदाचित.. पण जादू नक्कीच होते. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली, भावली तर त्याची लगेच पोच द्यायला शिका आणि तशी सवयच करून घ्या. खूप गरजेच आहे हे. कॉम्प्लिमेंट्स द्यायला आपण शिकलं पाहिजे असं वाटतं.

आपलं काय होतं ना की एखादी गोष्ट आपल्याला नाही आवडली तर ती व्यक्त करण्याची kind of प्रतिक्षिप्त क्रियाच आपल्या हातून होत असते. तेच जर एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर ते व्यक्त करायला मात्र आपण अळं-टळं करतो.
आणि काही वेळा काय होतं की, काही काही गोष्टी चांगल्या होणं आपण गृहितच धरतो. त्यामुळे त्याबद्दल कॉम्प्लिमेंट्स देणं विसरूनच जातो. अगदी तुमच्या जवळच्या माणसांपासून सुरूवात करा. तुमच्या आई-बाबा-आजी-आजोबा-मुलं-मुली-पती/पत्नी यांना कॉम्प्लिमेंट्स द्या आणि बघा आपल्या छोट्या छोट्या गोष्टींनीसुद्धा आपणं दुसर्‍याला किती आनंद देऊ शकतो.

लहान मुलांच्या बाबतीत तर कौतुक केलं जाणं खूपच महत्वाचं ठरतं, प्रेरणादायी ठरतं. ते त्यांच्यातल्या कलागुणांना फुलवण्याचं साधचं पण खूप परिणामकारक साधन आहे. त्यांच्या वाढीत कौतुकाचं खूप महत्त्व आहे. हे खरं आहे की नाही एखाद्या आईलाच विचारा. ती नक्की सांगेल.
उदाहरणच द्यायचं झालं तर लहान मुलं नुकतीच रेघोट्या मारायला शिकत असतातं तेव्हा आपण काढलेल्या वाकड्या तिकड्या गिरगोट्या दाखवून ती म्हणतात, ‘हे बद आई, मी हत्ती तादला, जिलाफ तादला’ तेव्हा तूम्ही जर त्यांच कौतुक केलं आणि म्हंटलं की वा! मस्तच हं! कित्ती छान काढला आहेस तू हत्ती-जिराफ. की बघा कशी खूष होऊन जातात ही चिमुकली. तेव्हा त्यांना वेगवेगळे सोपे आकार काढायला शिकवायचे आणि जे काही गिरगटतील त्याचं कौतूक करायचं. असं केलं तर लवकरचं या रेघोट्यांपासून प्रगती करत करत तुम्ही शिकवलेले आकार बरेच बरे काढायला लागतात.

तर असा आहे कौतुकाचा महिमा. लहानांपासून जेष्ठांपर्यंत सगळ्यांनाच सुखावणारे कौतुक. करून तर पहा कौतुक, बघा समोरचा किती आनंदतो. देऊन तर पहा कॉम्प्लिमेंट्स, बघा कशी कळी खुलते समोरच्या व्यक्तिची.