मिक्स वेज सूप (वेज पंचरत्न सूप)

साहित्यः
५-६ टोमॅटो, ७-८ गाजरं, १ कांदा, अर्धी ढबू मिरची, १ वाटी दूधी भोपळ्याचे तुकडे, १ चमचा बटर, १ चमचा ड्राइड बेसिल लिव्हज, चवीनुसार मीठ, मिरपूड, गार्लिक पावडर, साखर

कृती:
१) कुकरमध्ये २-३ भांडी पाणी घालून त्यात टोमॅटो, गाजरं, दूधी भोपळा, ढबू मिरची, कांदा घालून ३ शिट्ट्या करून भाज्या शिजवून घ्याव्यात.
२) भाज्या थोड्या गार झाल्या की त्यातल्या टोमॅटोची सालं काढून टाका आणि या सर्व भाज्या (आणि त्या भाज्या ज्या पाण्यात शिजवल्या ते पाणी) मिक्सर/ब्लेंडर मधून फिरवून त्याची प्युरी करून घ्या.
३) एका पॅनमध्ये/ स्टीलच्या कढईत १ चमचा बटर गरम करून त्यात ही भाज्यांची प्युरी घालून एका डावाने नीट ढवळून घ्या. आता त्यात ड्राइड बेसिल लिव्हज घालून त्याला एक उकळी आणा.
४) मग त्यात चवीनुसार  मीठ, मिरपूड, गार्लिक पावडर आणि सूप थोडं आंबट वाटल्यास थोडीशी साखर घाला.
गरमा गरम मिक्स वेज सूप तयार. हे सूप क्रूटॉन घालून खाऊ शकता किंवा तव्यावर बटर लावून भाजून टोस्ट केलेल्या ब्रेडसोबतही खाऊ शकता.

टीपा:
१) या सूपामध्ये भाज्यांच प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
२) बेसिल लीव्ह्ज, गार्लिक पावडर, बटर या गोष्टी ऑप्शनल आहेत.

IMG_20140423_205713

Advertisements

श्रीखंड

साहित्यः
दही, बारीक केलेली साखर, केशर, पिस्ते-बदामाचे तुकडे, (मोठ्या  छिद्राची) धान्य चाळायची चाळणी, (ही चाळणी ज्यावर बसेल असे) पातेले

कृती:
१) एका सुती कापडाची मोठी चौकोनी घडी करून घ्या. कापडाच्या मध्यभागी दही ओतावे आणि कापडाची चारी टोकं एकत्र बांधून हे कापडात बांधलेले दही टांगून ठेवा.
२) साधारण १०-१२ तासानंतर दह्यातले बरेच पाणी गळून गेले असेल. ह्या घट्ट दह्याला चक्का असं म्हणतात. हा चक्का एका बाऊलमध्ये काढून घ्या. केशराच्या काड्या हाताने चुरून एका छोट्या वाटीत ठेवा.
३) एक चाळणी घेऊन ती एका पातेल्यावर ठेवावी. चक्का थोडा थोडा चाळणीमध्ये घेऊन हाताच्या बोटांनी दाब देत गोलाकार पसरत रहावा.  (म्हणजे चक्का चाळला जाऊन एकजिनसी श्रीखंड तयार होईल.) हे करताना अधेमधे चक्क्यावर साखर, केशराचा चुरा घालत रहा.
४) पातेल्यामध्ये एकजिनसी श्रीखंड तयार झालेले असेल. श्रीखंडाची चव पाहून त्यात चवीनुसार गरज वाटल्यास आणखी साखर घाला. मोठ्या चमच्याने/डावाने श्रीखंड ढवळून एकजीव करा.
५) एका बाऊलमध्ये श्रीखंड घेऊन केशराच्या काड्या आणि बदाम/पिस्ते वापरून सजवा.

टीपा:
१) दही बांधून ठेवायला सुती कापड किंवा कॉटनची धुतलेली जुनी ओढणी वापरता येईल.
२) काही जण केशर वापरायच्या आधी तव्यावर्/कढल्यामध्ये थोडं गरम करून घेऊन चुरतात. त्यामुळे ते पदार्थात चांगल मिसळतं असं म्हणतात.

Image

Image

काही पदार्थ बनवताना वापरायच्या सोप्या ट्रिक्स आणि टीप्स

१) कोणताही मिल्क शेक बनवत असताना त्यात व्हॅनिला आइसक्रिम घातले की शेक चांगला दाट होतो आणि जास्त टेस्टी लागतो. उदा. चिकू शेक, बनाना शेक इत्यादी. तसचं स्ट्रॉबेरी शेक बनवताना स्ट्रॉबेरी आइसक्रिम, मँगो शेक बनवताना मँगो आइसक्रिम घालावं.

२) दुधी भोपळ्याची खीर/हलवा, गाजर हलवा असा कोणताही हलवा करताना त्यात एव्हरेस्ट दूधाचा मसाला वापरल्यास हलव्याला छान वास आणि स्वाद येतो. साधारण ४ मोठ्या वाट्या हलवा तयार होणार असेल तर त्याला चिमूटभर दूध मसाला पुरेल.

३) मिसळीसाठी ग्रेव्ही करताना, किंवा कोणताही कट करताना किंवा कोणतीही पातळ भाजी करताना, जर त्यावर तेलाचा लाल तवंग यायला हवा असेल तर भाजी/ग्रेव्ही तयार होत आली की एका मोठ्या चमच्यात तेल घेऊन त्यात पाव चमचा तिखट (लाल मिरचीची पूड) मिसळावे आणि ते तेल भाजीवर/ग्रेव्हीवर ओतावे आणि एक उकळी आणावी. तेलाचा मस्त लाल तवंग येतो.

वांग्याची भाजी प्रकार १

साहित्यः
४ मोठी वांगी, १ मोठा कांदा, १ छोटा बटाटा, तेल, मोहोरी, हिंग, हळद, केप्र गोडा मसाला, केप्र झटपट उसळ मसाला, तिखट, मीठ

कृती:
१) कांदा उभा चिरून घ्या. वांगी आणि बटाटाही उभट चिरा. (त्याचे ज्युलिअन्स करून घ्या.)
२) एका पसरट कढईमध्ये (किंवा पॅनमध्ये)  थोडं तेल घ्या. मध्यम आचेवर तेल तापत ठेवा.
३) तेल गरम झाल्यावर त्यात हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करून घ्या.
४) मग त्यात कांदा टाकून चांगला परतून घ्या. मग त्यात वांगी आणि बटाट्याचे ज्युलिअन्स टाकून चांगले परतून घ्या.
५) गॅस मध्यम आचेवर किंवा त्यापेक्षा थोड्या कमीच आचेवर ठेवा. अधून मधून भाजी परता. भाजी करपणार नाही याची काळजी घ्या. पॅनवर झाकण ठेवू नका.
(नेहमीपेक्षा कमी आचेवर ही भाजी करत असल्याने भाजी तयार होण्यास वेळ लागेल. म्हणून ही भाजी एकीकडे करत ठेवून दुसरीकडे स्वयंपाकघरातली बाकी कामं करून घ्या. 🙂 )
६) भाजी शिजत आली की त्यात चवीनुसार तिखट, मीठ, गोडा मसाला, उसळ मसाला घालून भाजी चांगली परतून घ्या. भाजी नीट शिजली की गॅस बंद करा. नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची मस्त वांग्याची भाजी तयार.

Vangyachi bhaji

टीपः
फ्रीजमध्ये थोडी तोंडली शिल्लक होती. म्हणून ह्या भाजीमध्ये थोडीशी तोंडलीही बारीक चिरून मी टाकली आहेत. फोटोमध्ये जे लहान हिरवे तुकडे आहेत, ती चिरलेली तोंडली आहेत. मस्त लागतात. अजिबात जाणवत नाही की तोंडलीही घातली आहेत ते. त्यामुळे तुम्हीही हा प्रयोग करायला हरकत नाही 🙂

पनीर (स्टफ्ड) पराठे

पनीरचे पराठे कधी केले नव्हते. एकदा करून पहायचे होते. मग माझ्या एका मैत्रिणीने, तृप्तीने मला ही रेसिपी सांगितली. त्या रेसिपीने पराठे करून पाहिले. पराठे चांगले झाले. कमी मिरची घातल्यास लहान मुलेही हे पराठे आवडीने खातील. जेवणाच्या डब्यामध्ये देण्यासाठी चांगला ऑप्शन आहे. आणि त्या मानाने हे पराठे कमी वेळात तयार होतात.

साहित्यः
किसलेले पनीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरेपूड, धनेपूड, मीठ, आलं पेस्ट (किसलेलं आलं), बारीक चिरलेली हिरवी मिरची (हिरवी मिरची पेस्ट), पोळीसाठी मळलेली कणिक (गव्हाच्या पिठाची)

कृती:
१) एका कुंड्यामध्ये/बाऊलमध्ये पनीर, जिरेपूड, धनेपूड, मीठ, किसलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची घेऊन एकत्र मिक्स करून घ्या. मिश्रण चांगलं मळून घ्या.
२) या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून नीट मिक्स करून घ्या. पराठ्याचे सारण तयार.
३) तवा तापायला ठेवा. कणिकेचे छोटे गोळे करून घ्या.
४) तवा चांगला गरम झाला की कणकेचा एक गोळा घेऊन त्यामध्ये पराठ्याचे सारण भरून (स्टफ करून) तो गोळा लाटून घ्या.
५) ही लाटलेली पोळी (लाटलेला स्टफ्ड पराठा) तव्यावर दोन्ही बाजूनी छान भाजून घ्या.
६) तयार गरम पराठा दही/बटर/तूप आणि शेंगदाण्याची चटणी/टोमॅटो केचप/लोणचं याबरोबर खा.

IMG_20140129_131235

IMG_20140129_131249

IMG_20140129_135228

IMG_20140129_135336

स्वतःच स्वत:ला घडवणं

स्वतःच स्वत:ला घडवणं… अवघड काम आहे.

स्वतःच स्वतःला घडवणं म्हणजे स्वतःला एक better person बनवणं. मग जसं दगडातून मूर्ती घडवताना, त्याला सुबक आकार देण्यासाठी ठाकून ठोकून त्याचा अनावश्यक भाग काढून टाकावा लागतो, त्याचप्रमाणं स्वतःमधले दुर्गुण, आळस, वाईट सवयी प्रयत्नपूर्वक दूर कराव्या लागतात. दुर्गुण दूर करण्यासाठी आधी ते शोधावे लागतात, हे दुर्गुण आपल्याकडे आहेत हे स्वतःशी मान्य करावं लागतं. मग ते दूर करण्याचा प्रयत्न करता येतो. आणि हे जाणीवपूर्वक करणं किंवा जाणतेपणी स्वतःला घडवणं जास्त अवघडं असतं.