माझी उत्साहमूर्ती आजी

नीट चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी, काळ्या-चंदेरी केसांचा घातलेला सुबक अंबाडा, शांत-समाधानी चेहर्‍यावर फुललेलं स्मितहास्य. प्रसन्न व्यक्तिमत्त्व. अशी माझी आजी.

लहानपणापासून तिच्याशी गप्पा मारायला मला खूप आवडतं. ती म्हणजे चैतन्याचा खळाळता झरा. तिच्याशी बोललं की कसं छान वाटतं. मी आजवर कधी तिला कंटाळलेलं, थकलेलं पाहिलंच नाहिये. सदैव हसतमूख, उत्साही, बोलक्या स्वभावाची, आम्हा नातवंडांपेक्षाही तरूण अशी माझी आजी. सतत काही ना काही कामात व्यग्र. कित्येक वेळा तिच्या बरोबर काम करता करता आम्ही थकून जातो पण आजी मात्र अजिबात दमत नाही. म्हणून आम्ही तिला म्हातार्‍या नातवंडांची तरूण आजी म्हणतो स्मित

असंच एकदा मी तिला विचारलं, “आज्जी, तूझ्या अखंड उर्जेच रहस्य काय?” तर ती म्हणाली “जेव्हापासून आम्हाला कळतं आहे तेव्हा पासून आम्ही कामचं करत आहोत. या सतत काम करण्यामूळचं आत्ताही एनर्जी टिकून आहे.”

घरात एखादा कार्यक्रम असेल तर त्याची तयारी, मग कार्यक्रम, मग नंतरची आवरा-आवर, अशा वेळी कधी कधी खरचं असं होतं की घरातली सारी मंडळी थकून जातील, पण आजी मात्र कामं करूनही फ्रेश. आणि ती स्वतः भरपूर काम करत असली तरी सहसा दुसर्‍याला कामं सांगायची तिला फारशी सवय नाही. उलट कोणी आलं की स्वतः चहा करेल, सोबत डब्यातून खाऊ/बिस्किटं काढून डीशमध्ये देईल. हे खा, ते खा असा आग्रह करेल.

रिकाम्या वेळात ती रोजचा पेपर आवर्जून वाचते. रोजची आवडीची मालिका पहाते, त्याची स्टोरी (जणू काही त्यातली पात्रं खरीच आहेत या भावाने) आम्हाला सांगते स्मित तिची स्वतःची एक छोटी डायरी ती मेंटेन करते ज्यात तिला लागणारे फोन नंबर, पत्ते तिने सुवाच्य अक्षरात लिहिले आहेत. आता तिचं थोडं जास्त वयं झाल्यामुळे काही गोष्टी तिच्या पूर्वीइतक्या लक्षात रहात नाहीत पण अगदी परवा-परवा पर्यंत सगळ्यांचे (मुलं, मुली, सूना, जावई, नातवंड) वाढदिवस लक्षात ठेवून प्रत्येकाला आजीचं पत्र किंवा फोन नक्की असायचा. आता लक्षात येइल तेव्हा फोन करते आणि वाढदिवशी प्रत्यक्ष भेट होणार असेल तेव्हा आजही काही ना काही खाऊ/भेट आवर्जून देते.

कूटंबातल्या प्रत्येकाची तिला काळजी असते. कोणाला काही दुखलं-खूपलं, कोणाची तब्येत बरी नाहीये अशा वेळी तिचही मन काळजीत असतं. ती तिथे असेल तर मग कुठे काढा करून दे, कुठे माहिती असलेले काही घरगुती उपाय सूचव असं करत रहाते आणि ती लांब असेल तर मग फोनवरून हे उपाय सांगते. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तिच्या परीने ती त्यावर सोल्यूशन सूचवत असते. वयोमानानुसार तिलाही दू़खतं – खूपतं असेल पण आजवर मी तिच्या तोंडून तब्येतीच्या तक्रारी फारशा ऐकल्या नाहीत. किंवा कोणालाही ‘माझं डोकं चेपून द्या, बाम लावून द्या, पाय चेपून द्या’ असं स्वतःहून सांगितल्याचं मला स्मरतं नाही.

एखादे गेटटूगेदर आम्ही कधी कुठे रेस्टॉरंटमध्ये ठरवले असता छानशी साडी नीट नेसून, केसांचा नीटनेटका अंबाडा घालून, हलकीशी पावडर लावून सगळ्यांबरोबर उत्साहाने येते. स्वत:साठी इडली-दोसा असे पचायला हलके पदार्थ मागवते. पण आम्ही आग्रह केला तर आम्ही मागवलेले (तिच्यासाठी) नवीन पदार्थही टेस्ट करते, जसं की पिझ्झा, पास्ता, नूडल्स वगैरे. कुठेच नव्या पिढीबद्दल तक्रारी नाहीत, आजकालची मूलं म्हणजे… असा सूर नाही. उलट प्रत्येक पिढीशी छान जूळवून घेते, छान मिक्स होते. ओपन माइंडेड आहे माझी आजी.

रूढी-परंपरांबद्दलही आजी काही प्रमाणात आधुनिक विचारांची आहे. आजोबांचं निधन झाल्यानंतर तिनं मंगळसूत्र घालणं सोडलं पण टिकली अजूनही लावते. छान रहाते. देवावर विश्वास आहे तिचा खूप. रोज देव-पूजा, स्तोत्र म्हणणे हे सगळ करते. पण ते स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःपुरतं. कशाचही अवडंबर नाही. दुसर्‍याला कशाचीही सक्ता नाही.

या माझ्या आजीशी बोलताना कधी आपल्याला जनरेशन गॅप वगैरे काही जाणवतं नाही. खरचं. ती अगदी लहान बाळापासून ते वृद्धांपर्यंत कोणाशीही सहजतेने संवाद साधते. जे जे कोणी तिच्या संपर्कात येते त्यांना ती काही भेटींमध्येच आपलसं करते. तिने खरं तर आयुष्याच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक बर्‍या वाईट घटना पाहिल्या, अनुभवल्या असतील, पण स्वभावात किंवा बोलण्यात कुठेही कटूता नाही, वैताग नाही. याचा अर्थ तिच्या वाट्याला दू:ख कधी आलेच नाही असं मूळीच नाही. पण त्या त्या प्रसंगी खंबीर होत तिने ते प्रसंग निभावून नेले आणि नेहमी आनंदी राहिली. कारण “आयुष्यात घडणार्‍या बर्‍या, वाईट सगळ्या घटना अ‍ॅक्सेप्ट करून पुढे जाणे, प्रॉब्लेम्स आले तर ‘हे माझ्याच बाबतीत का झालं’ असा विचार करत बसण्यापेक्षा त्यावर सोल्यूशन शोधणे, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहाणे” हे तिच्या जगण्याचं साधंसोपं सूत्र आहे. भूतकाळाबद्दल विचार न करता, भविष्याची काळजी न करता, वर्तमानात आनंदी रहाणं तिनं छान साधलं आहे.

तिला नवीन गोष्टी शिकायची खूप हौस आहे म्हणजे अगदी टी.व्ही. चा रिमोट कसा वापरायचा यापासून ते मोबाईलवरून फोन कसा लावायचा, कसा रिसिव्ह करायचा इथपर्यंत अनेक गोष्टी शिकण्यात तिला रस असतो. आणि हो, तिला बोलताना इंग्लिश शब्द वापरायचीही खूप आवड आहे. आम्हा नातवंडांच्या तोंडून एखादा नवीन तिला माहिती नसलेला इंग्लिश शब्द आला की ती त्याचा अर्थ विचारते आणि बरोबर लक्षात ठेवून पुढच्या वेळी योग्य ठिकाणी आठवणीने वापरते. कोणत्याही नवीन गोष्टी आत्मसात करणं तिला आवडतं. वयाच्या ऐंशीव्या वर्षानंतर तिनं मावशीबरोबर पहिला विमानप्रवास केला, अजिबात न घाबरता. कौतूक वाटतं मला तिचं.

तिच्या काळी ती चौथीपर्यंत शिकली. त्यापुढेही तिला शिकवायचा तिच्या दादांचा आग्रह होता असं ती सांगते. “त्या लहान वयात शिक्षणाचं महत्त्व तितकं वाटलं नाही. शिकायचं म्हणजे एका जागी बसणं आलं आणि लहानपणी खेळण्याकडे खूप ओढा असतो ना, त्यामुळे नाही शिकले पुढे. पण शिकायला हवं होतं खर तरं” असं म्हणते. तिला पेटी वाजवायला आवडतं, गाणं म्हणायला आवडतं. वयाच्या ५०-५५ व्या वर्षी तिने गायनाची परीक्षा दिली आणि त्यात ती पहिली आली.

अशा माझ्या तरूण आजीला उत्तम आयूरारोग्य लाभो आणि अशी आजी सगळ्यांना मिळो हीच सदिच्छा.
तिच्याकडे पाहून मनोमनं मी हेच ठरवलं आहे की मी जेव्हा तिच्या वयाची होईन तेव्हा मी पण अगदी तिच्यासारखीच होण्याचा प्रयत्न करेन, सर्वांना हवीहवीशी वाटणारी हसतमूख आज्जी स्मित

Advertisements

मॉर्निंग वॉक – एक चांगला आणि सोपा व्यायाम प्रकार

वजन कमी करणे, बारीक होणे हा आजकाल सगळ्यांचाच एकदम जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. हा विषय जितका जिव्हाळ्याचा तितकाच डोकेदूखीचा पण आहे. कारण वजनाचा काटा वाढताना सर्रकन वाढ्तो आणि कमी व्हायचे तर नाव घेत नाही. म्हणजे वाढताना मणामणाने आणि कमी होताना कणाकणाने 🙂

तर एकदा मलाही असंच वजन कमी करावसं वाटत होतं. तसं त्याआधी २ एक वर्षापूर्वी जिमचा वेटलॉस  प्रोग्रॅम केला होता. तेव्हा दोन महिन्यांमध्ये साडेतीन-चार किलो वजन कमी झाले होते. मशिन एक्झरसाइझ आणि फ्लोअर एक्झरसाइझचं कॉम्बिनेशन असे. अशा प्रोग्रॅम्समध्ये खाण्याची पथ्थ्ये पण फार पाळावी लागतात. काय खावं, काय खाऊ नये, किती खावं ते सांगितलेलं असे. गोड अजिबात म्हणजे अजिबात खायच नाही.

रोज काय जेवलो, किती जेवलो ते एका डायरीमध्ये लिहून ती डायरी इन्स्ट्रक्टरला दाखवावी लागे. बरेचदा म्हणजे जवळजवळ ९०-९५% वेळा पथ्थ्य पाळली जायची आणि कधी कधी नाही पाळली जायची तेव्हा मग वजनकाटा लगेचच ते आगाऊपणाने दाखवून द्यायचा 😦 रोजच्या रोज वजन करायचं असे आणि ५०/१०० ग्रॅम वजन वाढलं तरी इन्स्ट्रक्टर ‘कारणे दाखवा’ नोटिस बजावत असे. मग आम्ही पण होमवर्क न केलेल्या मुलासारखा चेहरा करून अशीच काही-बाही कारणं सांगत असू की, कसं काय वाढलं वजनं कोणास ठाऊक. खरं तरं नेहमीचचं जेवले आहे वगैरे वगैरे 😉 असा सगळा प्रकार होता तो.

यावेळी परत जिम लावायचा कंटाळा आला होता. तसही जिमपेक्षा मला मोकळ्या हवेत फिरायला जायला खूप आवडतं. फ्रेश वाटतं आणि व्यायाम करणं हे एक काम वाटतं नाही. मग मी ठरवलं की जवळच्या एका ग्राउंडवर सकाळी वॉकला जायचं. ग्राउंडवर पोहोचल्यावर अर्धा तास ग्राउंडला चकरा मारायच्या. अर्ध्या तासाने घरी जायला निघायचं. रोज घरून निघायची वेळ साधारण फिक्स ठेवली. पण कधी कधी ऊशीर झाला तरी फिरायला जायचा नेम चुकवला नाही. ऊशीरा तर ऊशीरा. मग जेव्हा पोचायचे तेव्हा घड्याळ पहायचे आणि बरोबर अर्धा तास व्यायाम करून मग घरी जायला निघायचे.

पहिले काही दिवस खूपसं चालतं आणि थोडं अंतर पळत अशी ग्राउंडला फेर्‍या मारायचे. नंतर हळूहळू पळण्याचं प्रमाणं वाढवतं गेले. नंतर नंतर आपला स्टॅमिना पण आपोआप वाढत जातो. मग जितकं जास्त शक्य आहे तेवढं अंतर पळतं जायचं, दम लागला की चालायचं, मग परत पळायचं असं करतं ग्राउंडला फेर्‍या मारायचे. रोजच्या रोज जायचा मात्र अजिबात कंटाळा केला नाही. कोणत्याही प्रकारच्या व्यायामाचे चांगले रिझल्ट हवे असतील तर त्यात सातत्य हवचं. ग्राउंड इतकं मोठं होतं की एक फेरी मारायला १० मिनिटं लागायची. अशा ३ फेर्‍या रोज व्हायच्या. लवकरच म्हणजे महिन्या-दीड महिन्यांनंतर मलाही जाणवलं की व्यायामाचा चांगला उपयोग झाला आहे आणि परिचितांच्या कॉम्प्लिमेंटस पण मिळू लागल्या की बारीक झाली आहेस बरं का 🙂

तरं असा फायदा झाला चालत-पळतं व्यायामाचा. म्हणून म्हंटलं ह्यावरच एक पोस्ट लिहूयात. कोणाला उपयोग झाला तर चांगलचं आहे.

मॅप रिडिंग…

ही गोष्ट आहे मी लंडनमध्ये होते तेव्हाची. ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी ६ च्या दरम्यान धावत पळत स्टेशनवर आले आणि नेहमीच्या ट्रेनमध्ये बसले. त्या दिवशी बहुधा शुक्रवार असावा. कारण ट्रेन बरीच रिकामी वाटत होती. ट्रेनमध्ये जास्त गर्दी नव्हती. मी एका रिकाम्या सीटवर स्थानापन्न झाले.

त्यानंतर १०-१५ मिनिटांनी एक ६०-६५ वयाचा ब्रिटिश माणूस हातामध्ये कसलासा भलामोठा मॅप घेऊन माझ्याजवळ आला. चांगलाच फुल झालेला दिसत होता 😉 पण सभ्यपणे बोलत होता. मला त्याने एका ठिकाणाचं काहीतरी नावं सांगितलं (नेमकं काय नावं सांगितलं ते आता आठवत नाही) आणि म्हणाला की ‘मला ते ठिकाण या मॅप मध्ये शोधून देशील का?’. असं म्हणून त्याने तो मोठाला मॅप माझ्याकडे दिला. आधीच मॅप्सच आणि माझं वाकडं आहे. त्यात लंडनमध्ये येऊन तेव्हा ४-५ महिनेच झाले होते त्यामुळे  मला फार फार तर घर ते ऑफिस आणि आसपासची काही स्टेशन्स एवढीच काय ती माहिती होती. तरीही लगेच ‘नाही’ कशाला म्हणा, बघू तरी सापडतं आहे का ते ठिकाणं त्या मॅपवर असं (मनात) म्हणून मी तो नकाशा चाळू लागले पण ३-४ मिनिटे झाली तरी मला काही ते ठिकाण सापडलं नाही, हे पाहून त्या माणसाने काहीसं वैतागून माझ्याकडून मॅप परत घेतला आणि मला म्हणाला, “Girls can never read a map..”

मला आधी खूप राग आला त्या माणसाचा. इथे मी त्याला मदत करायचा प्रयत्न करत होते आणि हा माझ्यावरच का वैतागतोय. पण नंतर हसू आलं कारण मला खरचं मॅपवरून एखादं ठिकाणं शोधणं अवघडं जातं 🙂

यावरूनच मॅप रिडिंगचा अजून एक किस्सा आठवतो आहे तो लंडनचाच. मी ऑफिस जॉइन केलं त्यानंतर १-२ दिवस ट्रेनने एका कलिगबरोबर ऑफिसला जात होते. त्यानंतर माझं मलाच जायचं होतं. तसं तिसरे दिवशी मी एकटीच ऑफिसला जाणार होते. ऑफिसजवळच्या ट्रेन स्टेशनवर उतरल्यावर तिथून ऑफिसपर्यंत चालत जायचा १० मिनिटांचा रस्ता आहे. तो बर्‍याच छोट्या गल्लीबोळातून जात होता. दोन दिवस त्या रस्त्याने सहकार्‍याबरोबर गेल्याने ‘सोपा रस्ता आहे’ असं वाटतं होतं आणि बराचं लक्षात ठेवायचा प्रयत्न केला होता. सो तिसर्‍या दिवशी एकदम आत्मविश्वासाने इच्छित ट्रेन स्टेशनवर उतरून तिथून चालत निघाले. निम्मी वाटं परफेक्ट लक्षात ठेवली होती पण आता दोन दिशेला जाणारे रस्ते लागले आणि इथे घोडं अडलं, डावीकडे वळायचे का उजवीकडे? मोठा प्रश्न पडला. आता काय करावं. मग सॅकमधला मॅप बाहेर काढला आणि तो काढून थोडं अंतर (उगाचच ;-)) इकडे-तिकडे जाऊन आले. पण मॅपवरून ऑफिस गाठणे काही जमलं नाही.

रस्त्यावर माणसांचा आणि वहानांचा गजबजाट होता. मग म्हंटलं इंडियन GPS सिस्टिम वापरू 😉 रस्त्यावरच्या १-२ जणांना हवा असलेला पत्ता सांगितला. आणि त्यातून कन्फ्युजन अजून वाढले. कारण एकाने डावीकडे आणि एकाने उजवीकडे जा असं सांगितले 🙂 सो इंडियन GPS सिस्टिमचे रिजल्टही इंडियन स्टाइअलनेच मिळाले 😉 असो. आता मात्र उशीर होत होता. मग सरळ तिथल्याच एरियात काम करणार्‍या मित्राला फोन लावला आणि माझं लोकेशन सांगून तिथे ये आणि मला माझ्या ऑफिसला कसं जायचं ते सांग असं सांगितलं. मग तो दोनच मिनिटात पोचला आणि त्याने मला रस्ता नीट सांगितला. खरं तर मी ऑफिसपासून दोनच मिनिटांच्या अंतरावर होते पण गल्ली-बोळ विसरल्याने रस्ता आठवतं नव्हता. आणि थोड्या दिवसांनी तो एरिया माहिती झाल्यावर हेही लक्षात आलं की मी जिथं उभी होते, तिथून डावीकडून आणि उजवीकडून दोन्ही बाजूंनी ऑफिसला जायला रस्ता आहे 🙂

माझे केकचे प्रयोग

माझे केकचे प्रयोग

महिन्या-दिडमहिन्यापूर्विची गोष्ट आहे ही. लेकीचा दुसरा वाढदिवस २-३ दिवसांवर आला होता. सगळी तयारी जवळजवळ झाली होती. वाढदिवस विकडे ला होता. आणि बर्थडे पार्टी विकेन्डला ठेवली होती. त्यामुळे विकडेला मोठं सेलेब्रेशन करायचं नसलं तरी तिला नविन ड्रेस घालणं, औक्षण करणं, जवळच्या २-३ बच्चे कंपनीला बोलावून केक कापणं असं करण्याचा प्लॅन होता. मनात असं खूप होतं की तिच्या वाढदिवसाला निदान छोट्या सेलेब्रेशनला केक आपणचं करायचा.
पण इथं केक येतोय कुणाला. मग म्हटलं मॉलमधून केक मिक्स घेउन येऊ आणि करून टाकू केक. हा.का.ना.का. त्याप्रमाणं केक मिक्सचं पॅकेट आणलं. घरी आल्यावर त्यावरची केक रेसिपी वाचली तर त्यात एग घाला असं लिहिलं होतं 😦  आता मूळात केकचं करायला येत नाही म्हंटल्यावर त्या केक मिक्सचा एग न घालता कसा केक बनवायचा, हे कसं जमावं. एग ऐवजी काय घालायचं कुणाला माहितं.
आता काय करावं बरं?
मग गुगलबाबाला पाचारणं केलं, म्हटलं, एगलेस केक शोधं बरं जरा. एक एगलेस रेसिपी ट्राय केली. मस्त झाला केक. मग थोडा उत्साह आणि कॉन्फिडन्स दोन्ही वाढला.
मग नेटावर नेटाने बरीच शोधाशोध सुरू केली एगलेस केक रेसिपीची. मला जनरली रेसिपी विडिओ आवडतात कारण एन्ड रिझल्ट लगेच पहायला मिळतो म्हणून 🙂  तशी १ छान रेसिपी मिळाली. लगोलग लिस्ट करून सर्व साहित्य आणण्यात आले आणि बर्थ-डे च्या दिवशी दुपारी केक करायला सुरूवात केली. रेसिपीची एक आणि एक स्टेप जशीच्या तशी फॉलो करण्यात आली. तरी मनात सारखं येत होतं, हे आपलं केक बॅटर काहीतरी वेगळंच दिसतयं :-/ आणि त्या केकवालीचं किती छान टेक्सचर आलयं केक बॅटरचं. का बरं असं दिसतयं हे, आपला पहिला केक तर छान झाला होता, त्याचं बॅटर असंच दिसत होतं ना त्या केकवालीसारखं. मग काय झालं आहे या वेळेला :-० कुणास ठाउक? मग म्हंटलं काही प्रमाण चुकलं असेल का. मग मनानीचं थोडे पदार्थ कमी जास्त घालून थोडी डागडुजी करण्याचा प्रयत्न झाला. मग म्हंटलं ठीक आहे. चला. ओव्हन्मध्ये ठेवू आता. केक तयार होऊन बाहेर येउन कुलिंग रॅक वर स्थानापन्न झाला. माझं परत कंपॅरिझन सुरू झालं तिचा केक, माझा केक. केक तसा छान झाला होता. चव पण वाइट नव्हती. पण माझा जरा जास्त कृष्णवर्णिय वाटतं होता. पण म्हंटलं होतं असं कधी कधी आपला या रेसिपीचा पहिलाचं प्रयोग आहे. मेंदीचा कोन करून त्यात बटर आयसिंग घालून केकवर नक्षी काढून झाली 🙂
केक गोंडस दिसत होता. हा असा,

संध्याकाळी बच्चे कंपनी आली. बर्थडे गर्लच आणि बाकी मुलांचही औक्षण झालं. केक कापला. मुलांनी आणि त्यांच्या आयांनी (माझ्या मैत्रिणींनी) केक खाल्ला.  मैत्रिणींनीही ‘चांगला झाला आहे बरं का केक’ असं म्हंटलं. (केक घरी केलाय हे सांगितल्यावर असं म्हणावचं लागत नां 🙂 ) आणि मुलांनी पण मागून मागून केक खाल्ला.
माझा उत्साह आणखी वाढला. आणि मनात आलं की विकेन्ड पार्टीला पण आपणच केक बनवायचा का. आता पार्टीला २/३ दिवस उरले होते. मी ठरवलं की मागचा केक काही फार ग्रेट झाला नाहीये. आता एखादी नवीन रेसिपी ट्राय करू. मग अजून एक रेसिपी शोधून काढली. आणि म्हंटलं आज ही करून पाहू. मग सामानाची जमवाजमव सुरू केली. रेसिपी करायच्या आधी मी टेबलवर/काउंटरवर सगळे घटक (इन्ग्रेडिअंट हो) काढून ठेवते. तेव्हा मैदा काढताना म्हंटलं परवाच केक केला आहे. सो मैद्याचे पॅक बाहेरच आहे. त्यातून मैदा काढताना सहज लक्ष गेलं माझं मैद्याच्या पॅककडं आणि युरेका युरेका… मला हसावं की रडावं कळेना. मग मी हसत सुटले आणि नवर्‍याला लगेच फोन करून ही गोष्ट सांगितली. तोही हसायला लागला. त्या पॅकवर ‘Rice Flour’ असं लिहिलं होतं 🙂 इन शॉर्ट मी मागच्या वेळेस तांदळाचा बर्थडे केक केला होता 😀 म्हणूनचं ते टेक्सचर वेगळं वगैरे वाटतं होत. आणि मी उगाच त्या केकावलीला आय मीन केकवालीला (मनातल्या मनात) नावं ठेवत होते. मग मनातल्या मनातचं  केकवालीला (आणि तांदळाचा केक खाल्लेल्या माझ्या मैत्रिणींना, बच्चेकंपनीला) सॉरी म्हणून घेतलं.
आता नव्या उमेदिने कामाला लागले आणि हाती घेतलेली रेसिपी पूर्ण केली. बेसिक चॉकलेट केक तयार झाला. हा असा,

यावेळी केक छान जमून आला. नवर्‍यालाही आवडला. आणि मनात ठरवलं की बस्स! विकेन्ड पार्टीला आपणचं केक बनवायचा! पण आता नेक्स स्टेप.. आता माझा आवडता एगलेस ब्लॅक फॉरेस्ट केक बनवायचा. मॉन्जिनीजची खूप आठवण आली. मॉन्जिनीजला मिस करत होते ना 😦 मग परत नेटवर शोधाशोध सुरू झाली. एगलेस ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री. पण ही पेस्ट्री काही मिळेना. पेस्ट्री म्हंटलं की स्नॅकचेच काहीबाही आयटम पेश व्हायला लागले :-/ मॉन्जिनीज केक/पेस्ट्री असं शोधून पण काही मिळेना. मग शेवटी ‘एगलेस ब्लॅक फॉरेस्ट केक’ चा शोध सुरू झाला. या विषयावर जोरदार R&D सुरू झाले. आणि बरीचं चांगली माहिती मिळत गेली.
नवर्‍याला काही अस्मादिक बर्थडे केक करणार असल्याचा बेत सांगितला नाही. कारण तो लगेच म्हणाला असता की नको नको तू काही करत नको बसू. आपण विकतच आणू केक. आपल्याला अजून पार्टीची तयारी करायची आहे वगैरे वगैरे. म्हणून मग ब्लॅकने (छुप्या पद्धतीने) ब्लॅक फॉरेस्टचे सर्व सामान घरी आणून ठेवले. आणि मग बर्थडेच्या दिवशी सकाळी प्लॅन जाहीर केला की मी (तुझ्या मदतीने – हे सायलेंट असतं ;-)) घरीचं केक करणार आहे. चांगला झाला तर संध्याकाळी हा केक कट करू. नाही झाला तर मग नवीन आणू.
मग खूप मेहेनत घेऊन, अहोंची (केक मिश्रण फेटायला) मदत घेऊन, त्याबदल्यात त्याला थोडे थोडे आयसिंग करायला देऊन 😉 एकदाचा केक सुफळ संपूर्ण झाला. आणि खरचं आमची मेहेनत फळाला आली आणि मस्त केक तयार झाला.
बा अदब, बा मुलाहिजा, होशिय्यार…… एगलेस ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री (बरीचशी माँजिनीज सारखी) येत आहे…

आणि हा फ्रीज मध्ये ठेवलेला केक मीच लहान होऊन सारखा सारखा फ्रीज उघडून पहात होते 🙂 आणि जेव्हा आमच्या छोट्या परीला हा केक दाखवला तेव्हा तर तिचा आनंद गगनात मावेना. ती नुसती तेतू, तेतू (केकू उर्फ केक) करून नाचायला लागली. तिची खुललेली कळी, फुललेला चेहेरा आणि तिच्या चेहेर्‍यावरून ओसंडून चाललेला आनंद बघून केकपायी केलेल्या सर्व कष्टाच सार्थक झाल्यासारखं वाटलं 🙂 आणि वाटलं की… ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ 🙂

तर असे होते माझे केकचे प्रयोग…
… (की माझी केक गाथा की केक कथा का केक पुराण ;-))  …. जे काहि असेल ते असो.

तर अशी ही साठा उत्तराची केक कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

टीपः  या वर दिलेल्या केकचा..
मेकिंग ऑफ ‘एगलेस ब्लॅक फॉरेस्ट केक’
हा एपिसोड पा.कृ. मध्ये लवकरच पोस्ट करीन 🙂

दिवाळीचे लायटिंग

दिवाळी अगदी तोंडावर आली होती. आणि दिवाळीची बरीच तयारी करून झाली होती. फराळाचे पदार्थ करून झाले होते. रांगोळ्या, पणत्या, मेणबत्त्या आणून झाल्या होत्या. आणि गेल्या वर्षीचा आकाशकंदिल ही सापडला होता.
मग लक्षात आले की अरे लायटिंगसाठी थोडी जास्त लांब वायर लागणार आहे. मग ती वायर आणण्यासाठी अस्मादिकांचे एका हार्डवेअरच्या दुकानात जाणे झाले. एक तर जनरली हार्डवेअरच्या दुकानात सहसा मुली कमी जात असल्याने कदाचित, आधीच दुकानदाराच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होते. मग त्याला कोणती वायर हवी, किती लांबीची वगैरे सांगितले. त्याने मला तशी एक वायर काढून दिली.
आता यानंतर मी ती वायर घ्यावी, पैसे द्यावे आणि कल्टी व्हावे अशी त्याची अपेक्षा. पण त्याच वेळी मला दुकानातली त्या वायरच्या टाइपमधली इतर रंगीत भेंडोळी दिसली आणि मी त्याला नेहमीच्या शॉपिंगच्या सवयीने विचारले,”यात काही आणखी काही कलर कॉम्बिनेशन मिळेल का.” 🙂 यावर त्याला काय बोलावे कळेना.
त्याच्या दुकानदारी आयुष्यात त्याला असा प्रश्न पहिल्यांदाच कोणीतरी विचारला असेल. त्याच्या चेहर्‍यावरील असे अगतिक 😉 भाव पाहून मग मात्र मी त्याला पैसे देउन घरी आले 😀

सेक्युरीटी चेक

आयुष्यात अनेक गमती जमती घडत असतात. असाच एक मजेशीर प्रसंग.

      २/३ वर्षापूर्वीची गोष्ट. वेळ आहे सकाळी ८ वाजताची. स्थळ आहे एका नामांकित आय. टी. कंपनीचे प्रवेशद्वार. बसमधून खाली उतरून सेक्युरिटीसमोरील  मुलींच्या रांगेत मी उभी होते. रोज सेक्युरीटीकडून बॅग चेक केली जाते, तशी आजही केली जात होती. आणि लाइन भरभर पुढे सरकत होती.
      माझा नंबर आला. नेहमीप्रमाणे मी माझी खांद्याला अडकवलेली पर्स उघडली. आणि लेडी सेक्युरिटी गार्ड  समोर धरली. तिने मग माझ्याकडे (आश्चर्याने?/संशयाने?) पाहिले आणि ती मला म्हणाली, “तुम्ही शेवया विकता का?” 😉  :-O मला क्षणभरं खूप राग आला आणि नंतर खूप हसू आलं.                                                                                                                                                                     त्याचं झालं असं होतं की माझ्या घराजवळ एके ठिकाणी हाताने बनवलेल्या शेवया छान मिळतात. त्याच एक लहान पॅक मी माझ्या एका संसारी मैत्रिणीसाठी आणलं होतं आणि ते नेमकं ट्रान्स्पारंट कव्हरमध्ये होतं.
That was one of the embarrassing moments of my life 🙂