पनीर (स्टफ्ड) पराठे

पनीरचे पराठे कधी केले नव्हते. एकदा करून पहायचे होते. मग माझ्या एका मैत्रिणीने, तृप्तीने मला ही रेसिपी सांगितली. त्या रेसिपीने पराठे करून पाहिले. पराठे चांगले झाले. कमी मिरची घातल्यास लहान मुलेही हे पराठे आवडीने खातील. जेवणाच्या डब्यामध्ये देण्यासाठी चांगला ऑप्शन आहे. आणि त्या मानाने हे पराठे कमी वेळात तयार होतात.

साहित्यः
किसलेले पनीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरेपूड, धनेपूड, मीठ, आलं पेस्ट (किसलेलं आलं), बारीक चिरलेली हिरवी मिरची (हिरवी मिरची पेस्ट), पोळीसाठी मळलेली कणिक (गव्हाच्या पिठाची)

कृती:
१) एका कुंड्यामध्ये/बाऊलमध्ये पनीर, जिरेपूड, धनेपूड, मीठ, किसलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची घेऊन एकत्र मिक्स करून घ्या. मिश्रण चांगलं मळून घ्या.
२) या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून नीट मिक्स करून घ्या. पराठ्याचे सारण तयार.
३) तवा तापायला ठेवा. कणिकेचे छोटे गोळे करून घ्या.
४) तवा चांगला गरम झाला की कणकेचा एक गोळा घेऊन त्यामध्ये पराठ्याचे सारण भरून (स्टफ करून) तो गोळा लाटून घ्या.
५) ही लाटलेली पोळी (लाटलेला स्टफ्ड पराठा) तव्यावर दोन्ही बाजूनी छान भाजून घ्या.
६) तयार गरम पराठा दही/बटर/तूप आणि शेंगदाण्याची चटणी/टोमॅटो केचप/लोणचं याबरोबर खा.

IMG_20140129_131235

IMG_20140129_131249

IMG_20140129_135228

IMG_20140129_135336

Advertisements

मूळ्याचे पराठे

मूळा सहसा कोणाला आवडत नाही. मला पण त्याच्या उग्र वासामुळे तो विशेष आवडत नसे. पण एकदा मूळ्याचे पराठे खाल्ले आणि तेव्हापासून मूळ्याचे पराठे माझे फेवरेट झाले.

साहित्यः
किसलेला मूळा, मीठ, साखर, तिखट, डाळीचे पीठ, कढिलिंब, तेल, जिरे-मोहरी, हिंग, हळद, कणकेचे (गव्हाचे) पीठ

कृती :
१) रोजच्या पोळीला लागते त्यापेक्षा थोडी सैल कणिक मळून घ्या. मळलेली कणिक झाकून ठेवा. एका सालकाढणीने मूळ्याचं बाहेरचा भाग स्वच्छ करून घ्या. मग मूळा खिसून घ्या.

२) एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात जिरे-मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की त्यात हिंग, हळद, कढिलिंब टाकावे. त्यात किसलेला मूळा टाकून मूळा चांगला परतून घ्या. ४-५ मिनिटं मध्यम आचेवर मूळा परतून घ्या.

३) मग १-२ मिनिटे झाकण ठेवून मूळा चांगला शिजू द्या. (मूळ्यात पाण्याचा खूप अंश असतो. त्यामुळे शिजताना वरून पाणी घालावे लागत नाही.)

४) आता त्यात चवीनुसार तिखट, मीठ आणि थोडीशी साखर घालून परता. (साखरेमूळे मूळ्याचा उग्रपणा कमी होतो.) या मिश्रणाला दाटसरपणा येण्यासाठी त्यात २-३ चमचे डाळीचे पीठ घालून २-३ मिनिटं परतून घ्या. मग हे मिश्रण एका ताटलीत काढून गार होऊ द्या. मूळ्याच्या पराठ्याचं सारण तयार.

५) कणकेच्या छोट्या गोळ्यामध्ये हे सारण भरा. आणि मग त्याचा पराठा लाटा. हा पराठा तव्यावर दोन्ही बाजूने भाजून घ्या. हिरवी/खोबर्‍याची/शेंगदाण्याची/लसूणाची चटणी आणि दही/बटर/तूप बरोबर खा.