उन्हाळ्यामध्ये जेवणात भाजीबरोबर एखादी कोशिंबीर असेल तर जेवणात जास्त मजा येते. त्यामुळे आजकाल घरी कधी काकडी, कधी गाजर, कधी टोमॅटो तर कधी चायोटीची कोशिंबीर केली जाते. आज गाजराच्या कोशिंबीरीची रेसिपी देत आहे.
साहित्यः ५-६ गाजरं, १ छोटा कांदा, लिंबू, दाण्याचं कूट, मीठ, साखर, कोथिंबीर,
फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी, जिरं, १-२ हिरव्या मिरच्या
कृती:
१) सालकाढणीने गाजराची सालं काढून गाजरं किसून घ्या. कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या. हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घ्या.
२) एका कुंड्यात(स्टीलच्या पातेल्यात/बाऊलमध्ये) गाजर, कांदा, कोथिंबीर एकत्र करा. त्यात दाण्याचं कूट घाला. मग ४-५ थेंब लिंबाचा रस घाला.
३) आता त्यात चवीनुसार मीठ, साखर घालून एकत्र ढवळून घ्या.
४) एका कढल्यात(अगदी छोट्या कढईत) थोडं तेल गरम करा. तेल गरम झालं की त्यात जिरं-मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात हिंग, मिरच्यांचे तुकडे घाला.
५) ही फोडणी आता गाजराच्या किसावर घालून एका डावाने नीट ढवळून घ्या. गाजराची कोशिंबीर तयार.