एक इवलसं रोपटं…

एक छोटसं, इवलसं, छान, तरतरीत, हिरवंगार रोपटं. नुकतच लावलेलं.

त्याला जर वेळच्या वेळी चांगल खतं-पाणी घातलं, चांगली निगा राखली, वेळोवेळी तण काढले, अशी त्याची काळजी घेतली तर ते पण आपल्याला भरभरून देतं. हां, हे करायला कष्ट जरूर पडतात. पेशन्स लागतो, सातत्य लागतं. पण हे सगळं आवश्यकच असतं नाही का. इवलसं आहे ते. त्याची काळजी आपणच तर घेतली पाहिजे ना. आणि हे श्रम मुळीच वाया जात नाहीतं.

त्या रोपट्याची हळूहळू निकोप वाढ होते. ते मस्त बहरतं, छान खुलतं, खूप खूप फुलतं. आपणही मग त्याच्याकडे पाहून खूश होतो, आपल्याला समाधान वाटतं.

तरीही त्याची काळजी घेत रहावीच लागते पण आता ती काळजी घेणं आपोआप अंगवळणी पडतं, त्यात आनंद वाटतो आणि त्याचं करायला पूर्वीइतके श्रमदेखील पडत नाहितं कारण तेही चांगलं पाय रोवून उभं राहिलं असतं. आणि आता तेच आपल्याला सावली देऊ लागलेलं असतं.

कोणत्याही नव्याने जोडलेल्या नात्याचंसुद्धा असचं असतं नाही का.
त्याची दोन्ही बाजूंकडून चांगली जोपासणी केली गेली तर ते का नाही बहरणार.

Advertisements

कौतुक

कौतुक … एकदम जादूई शब्द आहे ना. आणि त्याचा इफेक्ट पण जादूच्या कांडीसारखाच. सगळ्यांनाच आवडतं कौतुक. अगदी लहान मूलापासून ते आजी-आजोबांपर्यंत.. खरचं कोणी प्रशंसेचे दोन शब्द बोलले की कसं छान वाटतं ना, अंगावरून मोरपिस फिरल्यासारख.
आणि कौतुक कशाचंही केलं जाऊ शकतं अगदी लहान सहान गोष्टींचंही. ते करण्यासाठीही फार काही मह्त्कष्ट पडतात असंही नाही. दोन चांगले शब्द बोलायला काहीच त्रास नसतो.

मनुष्य स्वभावाचीही किती गंमत आहे ना. त्याला आपलं कौतूक केलेलं खूप खूप आवडतं, पण तेवढीच नावड असते दुसर्‍याच कौतूक करण्याची 🙂 काहींना नावडं असते तर काहींच्या गावीही नसतं की आवर्जून कुणाचं कौतूक करायला हवं.
पण एकदा ही जादूची कांडी फिरवून तर पहा ना. खरचं जादू होते 🙂 तुम्हाला लगेच जाणवणार नाही कदाचित.. पण जादू नक्कीच होते. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली, भावली तर त्याची लगेच पोच द्यायला शिका आणि तशी सवयच करून घ्या. खूप गरजेच आहे हे. कॉम्प्लिमेंट्स द्यायला आपण शिकलं पाहिजे असं वाटतं.

आपलं काय होतं ना की एखादी गोष्ट आपल्याला नाही आवडली तर ती व्यक्त करण्याची kind of प्रतिक्षिप्त क्रियाच आपल्या हातून होत असते. तेच जर एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर ते व्यक्त करायला मात्र आपण अळं-टळं करतो.
आणि काही वेळा काय होतं की, काही काही गोष्टी चांगल्या होणं आपण गृहितच धरतो. त्यामुळे त्याबद्दल कॉम्प्लिमेंट्स देणं विसरूनच जातो. अगदी तुमच्या जवळच्या माणसांपासून सुरूवात करा. तुमच्या आई-बाबा-आजी-आजोबा-मुलं-मुली-पती/पत्नी यांना कॉम्प्लिमेंट्स द्या आणि बघा आपल्या छोट्या छोट्या गोष्टींनीसुद्धा आपणं दुसर्‍याला किती आनंद देऊ शकतो.

लहान मुलांच्या बाबतीत तर कौतुक केलं जाणं खूपच महत्वाचं ठरतं, प्रेरणादायी ठरतं. ते त्यांच्यातल्या कलागुणांना फुलवण्याचं साधचं पण खूप परिणामकारक साधन आहे. त्यांच्या वाढीत कौतुकाचं खूप महत्त्व आहे. हे खरं आहे की नाही एखाद्या आईलाच विचारा. ती नक्की सांगेल.
उदाहरणच द्यायचं झालं तर लहान मुलं नुकतीच रेघोट्या मारायला शिकत असतातं तेव्हा आपण काढलेल्या वाकड्या तिकड्या गिरगोट्या दाखवून ती म्हणतात, ‘हे बद आई, मी हत्ती तादला, जिलाफ तादला’ तेव्हा तूम्ही जर त्यांच कौतुक केलं आणि म्हंटलं की वा! मस्तच हं! कित्ती छान काढला आहेस तू हत्ती-जिराफ. की बघा कशी खूष होऊन जातात ही चिमुकली. तेव्हा त्यांना वेगवेगळे सोपे आकार काढायला शिकवायचे आणि जे काही गिरगटतील त्याचं कौतूक करायचं. असं केलं तर लवकरचं या रेघोट्यांपासून प्रगती करत करत तुम्ही शिकवलेले आकार बरेच बरे काढायला लागतात.

तर असा आहे कौतुकाचा महिमा. लहानांपासून जेष्ठांपर्यंत सगळ्यांनाच सुखावणारे कौतुक. करून तर पहा कौतुक, बघा समोरचा किती आनंदतो. देऊन तर पहा कॉम्प्लिमेंट्स, बघा कशी कळी खुलते समोरच्या व्यक्तिची.