स्ट्रॉबेरी पिकिंग

ती शनिवारची सकाळ होती. विकेंड असल्याने आरामात उठून निवांत दिनक्रम चालू होता. ९ वाजले होते. सकाळचा चहा नुकताच झाला होता. तेवढ्यात फोन खणखणला. मैत्रिणीचा फोन होता. ती म्हणाली आज स्ट्रॉबेरी पिकिंगला जाऊया का, बारा साडेबाराला. कुठेही भटकायला जायचं म्हंटल की मी काय तयारच असते. नेटवर वेदर पाहिलं. चांगलं होतं. पाऊस नव्हता. घरातून लंच करून लगेच निघू. म्हणजे तिथं मस्त टाईमपास करता येईल, असं ठरलं. बच्चे कंपनीची व्यवस्थित पेटपूजा झाली असली की मग मोठ्यांनाही पिकनिकचा मनसोक्त आनंद घेता येतो 🙂

मग आम्ही ४-५ कुटूंब मिळून स्ट्रॉबेरी पिकिंगला जायचं ठरवलं. सगळ्यांच्या घरी एकदम घाई-गडबड सुरू झाली. लंचचे शोर्टकट मेनू बनवून, छोट्या पिल्लांच पटापट आवरून, त्यांना खाऊ-पिऊ घालून सगळी जण तयार झाली. एकच्या सुमारास सगळ्यांच्या गाड्या ‘पोर्टर फार्म्स अ‍ॅंड नर्सरी’ च्या रस्त्याला लागल्या.
I was so excited about it. मी पहिल्यांदाच चालले होते ना स्ट्रॉबेरी पिकिंगसाठी.

थोडे अंतर जातो न जातो तो पावसाची सर आली. आम्ही म्हंटलं झालं, आता कुठलं आलयं स्ट्रॉबेरी पिकिंग. या पावसाला पण ना , आत्ताच यायच होतं..   खरं तर नवर्‍याने एकदा छत्री घ्यायची आठवण केली होती. पण weather.com वर (नवर्‍यापेक्षा ;-)) जास्त विश्वास ठेवल्याने त्यालाच मी म्हंटलं होतं की, अरे त्यांनी लिहिलं आहे ना पाऊस पडणार नाही, मग मुळीच पाऊस पडणार नाही.. पण माझा विश्वास खोटा ठरवून पावसाने हजेरी लावली होती.

आमच्या सुदैवाने एक सर येऊन गेल्यावर पाऊस थांबला. छान उघडलं. आभाळ स्वच्छ झालं. अर्ध्या तासात आम्ही फार्मवर पोचलो. आपापल्या हातातल्या छोट्या छोट्या खेळण्यातल्या बास्केट्स सांभाळत बच्चेकंपनी स्ट्रॉबेरी गोळा करायला तयार.

गाडीतून उतरल्यावर लगेच फोटोसेशनला सुरूवात झाली. एका बाईंनी.. नको ताईंनी म्हणू 😉 पुढे होऊन आमच्याकडचे चारी कॅमेरे घेऊन प्रत्येक कॅमेरॅने आमचे ग्रुप फोटो काढून दिले. त्या फार्मच्या ओनर होत्या. त्यांनी वेलकम केले आणि सांगितले की स्ट्रॉबेरी रोपांच्या प्रत्येक रांगेच्या मधल्या आणि शेवटच्या भागात जास्त भाग स्ट्रॉबेरीज मिळतील.

सकाळी ८ वाजल्यापासूनच फार्म ओपन होते म्हणून कदाचित एन्ट्रन्सजवळच्या स्ट्रॉबेरी बर्‍यापैकी संपल्या होत्या. बास्केट्स त्यांच्याच घ्यायच्या होत्या. म्हणून मग खेळण्यातल्या बास्केट्स परत गाडीत गेल्या. मग प्रत्येक कुटूंबाने एक बास्केट घेऊन मुलांच्या हातात दिली.

फार्मला पर पर्सन एन्ट्री फी वगैरे काही नव्हती. आणि बास्केटचा चार्ज होता ८$ पर बास्केट. म्हणजे आपण त्या फार्ममधून १ बास्केट भरून स्ट्रॉबेरी निवडून घ्यायच्या आणि त्याचे ८$ द्यायचे. शिवाय फार्मवर आपण हव्या तेवढ्या स्ट्रॉबेरी खाऊ शकतो. त्याचा काही चार्ज नसतो.

साधारण Mid April ते early June हा स्ट्रॉबेरी पिकिंगचा सिझन असतो. म्हणजे जेमतेम दोनच महिने. मी स्ट्रॉबेरीची शेती पहिल्यांदाच पहात होते. दूरवर पसरलेल्या, एकमेकांपासून समान अंतरावर असणार्‍या स्ट्रॉबेरी रोपांच्या रांगा छान दिसत होत्या. दोन रांगामध्ये जायला-यायला म्हणून साधारण दीड फूटाचे अंतर होते.

मग स्ट्रॉबेरी गोळा करत, निम्म्या तोंडात टाकत आम्ही पुढे जात होतो. अधून-मधून हसी-मजाक, खेचाखेची, गप्पाटप्पा चालू होत्या. दुकानात मिळणार्‍या आणि फार्मफ्रेश स्ट्रॉबेरी यांच्या चवीतला फरक चांगलाच जाणवतो. फार्मफ्रेश स्ट्रॉबेरी खूपच छान लागतात आणि खूपच कमी आंबट वाटल्या.

मुलांनी तर फूल्टू धमाल केली. स्वत: स्ट्रॉबेरी तोडून खाण्याचे त्यांना खूपच अप्रूप वाटत होते. सगळ्यांनी स्ट्रॉबेरीवर मनसोक्त ताव मारला. आणि हात तोंड सगळे लाल – लाल करून घेतले. मग परत एकदा या मेकअपसह सगळ्या वानरसेनेचे आणि आमचेही फोटोसेशन झाले.

खूपच मजा येत होती ताज्या ताज्या लालचुटूक स्ट्रॉबेरी तोडून खायला. मस्तच. yummy….
दीड-दोन तास कसे गेले कळलचं नाही. ह्या पहा आम्ही तोडलेल्या स्ट्रॉबेरी…

आमच्या बास्केट्स आता स्ट्रॉबेरीनी काठोकाठ भरत आल्या. तरी फार्ममधून पाय निघत नव्हता. शेवटी ते काम पावसानेच केले. धो-धो पावसाची एक मोठी सर आली. आणि मग मात्र सगळे पळत पळत फार्मबाहेरच्या टेंटमध्ये आले. तिथे मग थोडा वेळ थांबून, बास्केटचे पैसे देऊन, स्ट्रॉबेरी बास्केट घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.

————————————————————————————————

फार्मवरचे इतर फोटो,

Advertisements

स्ट्रॉबेरी फ्रीज कशी करावी? साठवून ठेवावी?

स्ट्रॉबेरी फ्रीज कशी करावी? साठवून ठेवावी?                                                                                     (How to freeze Strawberry?)

परवाच स्ट्रॉबेरी पिकिंगला जायचा योग आला. खूप मजा आली. आणि खूप सार्‍या फ्रेश, सुंदर, लालचुटूक स्ट्रॉबेरी घरी आल्या. आल्या आल्या स्ट्रॉबेरीने भरलेली छोटी बकेट फ्रीजमध्ये ठेवली. मग दुसरे दिवशीपासून विचार सुरू झाला की इतक्या सार्‍या स्ट्रॉबेरीजचे करायचे काय? केकमध्ये घालाव्यात की जॅम  करावा की शेक करावा की आणखी काय करावे.

मग नेटवर जरा शोधाशोध केल्यावर स्ट्रॉबेरी साठवून ठेवायचे मार्ग सापडले. त्यातला सगळ्यात सोपा मार्ग भावला 😀 त्यानुसार स्ट्रॉबेरी फ्रीज करायचे ठरवले.मग थोडे R&D करून  स्ट्रॉबेरी फ्रीज केल्या. काम फत्ते.  🙂 मी जी वापरली तीच साधी सोपी पद्धत इथे देत आहे.

१) स्ट्रॉबेरीच्या सिझन मध्ये फ्रेश स्ट्रॉबेरी, फार्मवरून स्वतः तोडून आणावी किंवा दुकानातून विकत आणावी.


२) आणल्यावर लगेच साठवून ठेवायची नसेल तर मग ती फ्रीजमध्ये झाकण न ठेवता (uncovered) ठेवावी. पण आणल्यानंतर शक्यतो १-२ दिवसात स्ट्रॉबेरी फ्रीज करावी.

3) जेव्हा स्ट्रॉबेरी freeze करायची असेल तेव्हा ती फ्रीजमधून काढावी. चाळणीत/स्टेनर मध्ये घालून नळाच्या वाहत्या पाण्यामध्ये हलक्या हातानी (देठासकट) धुवून घ्यावी.


४) आता एका ट्रेमध्ये बटर पेपर/ प्लास्टिक / पार्चमेंट पेपर पसरून ठेवा. आता स्ट्रॉबेरीची देठं हातानी काढा किंवा एका कटिंग बोर्डवर स्ट्रॉबेरी ठेवून सुरीने त्याची देठं कट करा.

५) नंतर ती ५ मिनिटं किचन टॉवेलवर(टिश्यू पेपरवर) ठेवून निथळू द्यावी. मग कोरड्या किचन टॉवेलने स्ट्रॉबेरी हलकेच पुसून घ्या. टिश्यू पेपर स्ट्रॉबेरीला चिकटणार नाही याची काळजी घ्या.


६) ह्या देठं काढलेल्या स्ट्रॉबेरी आता ट्रेमध्ये ओळीने थोडे थोडे अंतर ठेवून ठेवा. हा ट्रे डीप फ्रीजरमध्ये २४ तास ठेवा.


७) २४ तासांनी फ्रोजन स्ट्रॉबेरी तयार. आता हेवी ड्यूटी फ्रीजर बॅग किंवा प्लास्टिक/ग्लास फ्रीजर कंटेनरवर मार्करने स्ट्रॉबेरी असं नाव आणि पॅकिंग डेट, एक्सपायरी डेट लिहून त्या बॅग/कंटेनर मध्ये ह्या फ्रोजन स्ट्रॉबेरी ठेवा. (फ्रोजन स्ट्रॉबेरी साधारण सहा महिने टिकतात, त्यानुसार एक्सपायरी डेट लिहा)

८) फ्रिजर बॅगमध्ये स्ट्रॉबेरी ठेवताना प्रथम त्यात स्ट्रॉबेरी भरून मग त्यातली हवा काढून झिपलॉक स्लाइडर शेवटचा एक इंच सोडून लावायचा. मग परत त्यातली उरलेली हवा काढून स्लाइडर पुढे नेऊन फ्रीजर बॅग पूर्ण सील करा आणि फ्रीजरमध्ये ठेवा.

९) फ्रीजर बॅग/ कंटेनर मध्ये स्ट्रॉबेरी ठेवताना एकाच मोठ्या कंटेनरमध्ये स्ट्रॉबेरी ठेवण्याऐवजी छोट्या छोट्या फ्रीजर बॅग्ज/ कंटेनर मध्ये ठेवा. म्हणजे गरज पडेल तेव्हा एकच कंटेनर उघडला जाईल व बाकीच्या स्ट्रॉबेरी आहे तशा ठेवल्या जातील आणि म्हणून जास्त टिकतील.

१०) जेव्हा ह्या फ्रोजन स्ट्रॉबेरी वापरायच्या असतील तेव्हा हव्या तेवढ्या स्ट्रॉबेरी पॅकमधून काढून फ्रीजबाहेर ठेवा. थोड्य नरम झाल्या की वापरा. या फ्रोजन स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी शेक/स्मूदी, स्ट्रॉबेरी जॅम/स्प्रेड/आईसक्रीम वगैरे बनवायला वापरता येतील.